नेदरलॅन्डमधील नाईट क्लबमध्ये थरारनाट्य

एडी (नेदरलॅन्ड) – नेदरलॅन्ड पोलिसांनी एका नाईट क्लबमधून बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. या नाईटक्लबमध्ये अनेक लोकांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यामुळे सुमारे तासभर तणाव निर्माण झाला होता.
एक – एक करून सर्व ओलीसांची सुटका करण्यात आली आहे आणि एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, असे पोलिसांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
ओलीस ठेवलेले सर्व नाईट क्लबमधून बाहेर पडल्यानंतर सर्वात शेवटी बाहेर पडलेल्या व्यक्तीला पोलिसांनी इशारा देऊन थांबवले आणि पोलिसांच्या वाहनामध्ये कोंबले आहे. या व्यक्तीच्या अटकेनंतर तासभर सुरू असलेले हे थरारनाट्य संपुष्टात आले आहे.
राजधानी ऍमस्टेरडॅमच्या अग्नेयेला ८५ किलोमीटर अंतरावरील एडी नावाच्या गावात हे थरारनाट्य घडले होते. मात्र नाईटक्लबमध्ये लोकांना ओलीस ठेवण्यामागे दहशतवादी कृत्याचा हेतू नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नाईट क्लबमध्ये एका व्यक्तीने अनेकांना ओलीस ठेवल्याचे वृत्त पसरताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या वाहनांनी या नाईट क्लबला वेढा घातला होता. एडीच्या बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद करण्यात आली होती आणि पुढील आदेश येईपर्यंत बाजार बंद राहिल असे नगरपालिकेने जाहीर केले होते.
अनेकांना ओलीस ठेवण्यामागचा हेतू काय होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर या थरारनाट्यामागील हेतू स्पष्ट होणे अपेक्षित आहे, असे पोलिसांनी सांगितले.





