Bhavaninagar : निरा नदीच्या पाण्यासाठी तीन साखर कारखाने एकवटले
Bhavaninagar : इंदापूर तालुक्यातील सराटी येथे शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर, उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळालेच पाहिजे या मुद्द्यावर सहमती दर्शवत, परंतु पाणी सोडण्याच्या पद्धतीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

भवानीनगर : निरा नदीच्या हक्काच्या पाण्यासाठी बारामती, इंदापूर तालुक्यातील तीन प्रमुख साखर कारखाने एकत्र आले आहेत. आमच्या हक्काचे पाणी आम्हाला मिळावे आणि पाणी वाटपात योग्य नियोजन व्हावे, यासाठी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. जर हक्काचे पाणी वेळेत आणि योग्य पद्धतीने मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यातील सराटी येथे शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर, उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाणी मिळालेच पाहिजे या मुद्द्यावर सहमती दर्शवत, परंतु पाणी सोडण्याच्या पद्धतीबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजवर्धन शिंदे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर तसेच संचालक मंडळ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले की, यावर्षी पाऊस फार कमी प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांसमोर पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. गेल्या आठवड्यात पुण्यामध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली असून, यात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि तीनही कारखान्यांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत रब्बी हंगामासाठी दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नदीमध्ये पाणी सोडल्यास ते खड्ड्यांमध्ये साचून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही आणि पाणी विनाकारण वाया जाईल. सोमवार (दि. १६) रोजी पुणे येथे होणाऱ्या कालवा समितीच्या शासकीय बैठकीत पाण्यासंदर्भातील निर्णयावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल.
इंदापूरच्या पूर्व भागातील शेतकरी आमचेच बांधव आहेत, त्यांना पाणी मिळालेच पाहिजे; परंतु ते पाणी नदीतून सोडल्यास कोणालाही मिळणार नाही. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व सर्वांना समन्यायी पाणी मिळण्यासाठी नीरा डाव्या कालव्यातूनच ठरल्याप्रमाणे दोन आवर्तने सोडण्यात यावीत.
– पृथ्वीराज जाचक, अध्यक्ष, श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना.





