ट्रकच्या धडकेत तीन वारकरी जखमी

कराड – वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) येथील जोतिबा देवाच्या यात्रेसाठी निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावर वाठार, ता. कराड गावच्या हद्दीत उड्डाणपुलावर ट्रकने रविवारी (दि. 2) रात्री 1 च्या सुमारास धडक दिली. या अपघातात प्रतीक सुभाष यादव (वय 23) हे गंभीर, तर आशुतोष गोपाळ नावडकर (वय 23) व शुभम सुनील नावडकर (वय 23, सर्व रा. राऊतवाडी-वाठार स्टेशन, ता. कोरेगाव) हे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मलकापूर येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वाठार स्टेशन येथून पन्नास वारकऱ्यांची दिंडी जोतिबा यात्रेसाठी निघाले होती. कराडजवळ एका हॉटेलमध्ये थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर रविवारी रात्री ही दिंडी महामार्गवरून पुढे निघाली.
दिंडीतील काही वारकरी पुढे गेले, तर चार जण मागे राहिले होते. महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू असल्याने सेवा रस्त्यावर साहित्य टाकण्यात आले होते. तेथून जाणे शक्य नसल्याने वारकरी वाठार गावच्या हद्दीततून उड्डाण पुलावरून निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने वारकऱ्यांना धडक दिली.
यामध्ये प्रतीक यादव गंभीर, तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. प्रतीक यादव यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर चालकाने ट्रकसह पळ काढला. या अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा झाली.





