कचरा फेकणे थांबवण्यासाठी तीन पर्याय,पुण्यात शिवसेना विभागप्रमुखाची नामी शक्कल

सिंहगडरस्ता, दि. 7 (प्रतिनिधी) – धायरी भागात अनेक ठिकाणी नागरिक रात्री बेरात्री नकळतपणे घरातील कचरा रस्त्यावर आणून टाकतात. त्यामुळे विशेषत: शाळांच्या परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत आहे. हे रोखण्यासाठी शिवसेना विभागप्रमुख महेश पोकळे यांनी नामी शक्कल लढवत कचरा टाकणाऱ्या नागरिकांना तीन पर्याय दिले आहेत. या होर्डिंगद्वारे एकप्रकारे जनजागृतीच केली जात आहे.
येथील सणस शाळेच्या सीमाभिंतीलगत वर्षानुवर्षे कचरा फेकला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य तर धोक्यात येतेच, शिवाय वर्दळीच्या परिसरात असह्य दुर्गंधी पसरत आहे.
हे प्रकार रोखण्यासाठी महेश पोकळे यांनी शाळेच्या लगतच हे होर्डिंग लावले आहे. त्यात त्यांनी कचरा न फेकण्याचे आवाहन करत नागरिकांना 3 पर्याय दिले आहेत. त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून, तेथे कचरा फेकण्याचे बंद झाल्याचे दिसत आहे.
धायरी परिसरातील जनतेला आवाहन…
1. तुमच्या घरी कचरा वेचण्यासाठी कचरा वेचक येत नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही त्याला पाठवू.
2. कचरा वेचक येतो. पण, त्याला महिना 50 रुपये देण्यासाठी तुमची तयारी नसेल, तर आम्हाला सांगा. आम्ही ते पैसे देऊ.
3. या व्यतिरिक्त काही अडचण असेल, तर आम्हाला व्हॉट्स ऍपवर कळवा. आम्ही त्याची दखल घेऊ. यापैकी योग्य तो पर्याय निवडा आणि आपले धायरी स्वच्छ ठेवण्यास मदत करा.’
बरेचसे नागरिक आता जागृत होत आहेत. व्हॉट्स ऍपवरून आम्हाला सूचना येत आहेत. धायरी परिसर स्वच्छ ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचे नागरिकांना आवाहन आहे, की आपण कृपया रस्त्यावर कचरा फेकू नका.
– महेश पोकळे, शिवसेना विभागप्रमुख





