Karachi building collapse : पाकिस्तानच्या कराची शहरातील ल्यारी परिसरात ४ जुलै रोजी पाच मजली इमारत कोसळल्याने २७ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका हिंदू कुटुंबातील २० नातेवाईकांचा मृत्यू झाला, परंतु त्याच कुटुंबातील ३ महिन्यांच्या चिमुकलीचा चमत्कारिकरित्या जीव वाचला. ही घटना कराचीतील बागदादी परिसरात घडली आहे, या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष या चमत्काराकडे वेधले गेले आहे. चिमुकलीचा चमत्कारिक बचाव बचाव पथकातील कर्मचारी मजहर यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली त्यांना एक जिवंत चिमुकली आढळली. “तिच्या नाकातून किरकोळ रक्तस्त्राव होत होता, पण तिच्या शरीरावर कोणतीही गंभीर जखम नव्हती. तिच्या जवळच तिच्या आईचा मृतदेह आढळला. कदाचित इमारत कोसळताना आईने मुलीला दूर फेकले असावे, ज्यामुळे तिचा जीव वाचला,” असे मजहर यांनी नमूद केले. या चिमुकलीच्या बचावाची तुलना अहमदाबादमधील विमान अपघातातील एका प्रवाशाच्या चमत्कारिक बचावाशी केली जात आहे, जिथे सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता, परंतु एक प्रवासी वाचला होता. दुर्घटनेचा भयावह चेहरा ही इमारत ल्यारीच्या बागदादी परिसरातील फिदा हुसेन शेखा रोडवर होती आणि ती आधीच जीर्ण झाल्याची नोंद सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी (SBCA) कडे होती. या इमारतीत ४० हून अधिक लोक राहत होते, ज्यात २० हिंदू कुटुंबातील नातेवाईकांचा समावेश होता. बचाव कार्य ५३ तास चालले, ज्यात २७ मृतदेह बाहेर काढण्यात आले, यात ९ महिला, १५ पुरुष आणि ३ मुलांचा समावेश आहे. बचाव पथकाने ट्रॅप्ड पर्सन लोकेटरसह हेवी मशिनरीचा वापर करत ढिगारा हटवला. शहरातील ५८८ इमारती जीर्ण घोषित कराचीतील ही दुर्घटना प्रथमच घडलेली नाही. शहरातील ५८८ इमारती जीर्ण घोषित केल्या गेल्या आहेत, यापैकी ४५६ दक्षिण जिल्ह्यात आहेत. ल्यारीतील १०७ इमारती धोकादायक आहेत, परंतु रहिवाशांनी आणि प्रशासनाने कारवाई न केल्याने अशी दुर्घटना घडली. सिंधचे स्थानिक सरकारमंत्री सईद घनी यांनी भ्रष्टाचार आणि बेकायदा बांधकामांना जबाबदार ठरवले आहे. सरकारने ५१ जीर्ण इमारती पाडण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु रहिवाशांना पर्यायी निवासाची व्यवस्था नसल्याने ही प्रक्रिया आव्हानात्मक आहे. दरम्यान, सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, इमारतीच्या बांधकामाला औपचारिक परवानगी नसल्याचे सांगितले. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी शोक व्यक्त करत जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच, कराचीतील ४८० हून अधिक धोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.