इस्लामाबाद – पाकिस्तानला नेहमीच भारताबरोबर सामान्य शेजाऱ्यासारखे संबंध हवे होते, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आम्हाला राजनैतिक मार्गाचा अवलंब करायचा आहे. पाकिस्तानची वचनबद्धता सर्वज्ञात आहे आणि ती अगदी स्पष्ट आहे.
पाकिस्तानला भारताबरोबर सामान्य शेजाऱ्यासारखे संबंध हवे आहेत, असे परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान म्हणाले. भारताबरोबरच्या संबंधांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिले.
सिंधू जल करार स्थगित करण्याची भारताची कृती पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टीने त्याला कोणतेही स्थान नाही, असेही या प्रवक्त्याने म्हटले आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक दंडात्मक उपाययोजना केल्या होत्या.
त्यामध्ये १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला होता. गेल्या महिन्यात, पाकिस्तानने भारताला सिंधू पाणी कराराची अंमलबजावणी पुन्हा पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले होते. हेगमधील कायमस्वरूपी लवाद न्यायालयाने अलिकडे म्हटले होते. तरी हा करार अजूनही वैध आणि कार्यरत असल्याचे देखील पाकिस्तानने म्हटले होते.
सिंधू पाणी कराराच्या तरतुदींनुसार दोन्ही प्रकल्पांवर पाकिस्तानने आक्षेप घेतल्यानंतर भारताने कायमस्वरूपी लवाद न्यायालयात चालणाऱ्या कार्यवाहीला कधीही मान्यता दिलेली नव्हती. लवादाचे अस्तित्वच भारताला अमान्य असल्यामुळे लवादाचा निर्णय भारताला बांधील नसल्याचे स्पष्टिकरण भारताने दिले आहे.
पाकिस्तान सार्क जाहीरनाम्यात नमूद केलेल्या तत्त्वांशी आणि उद्दिष्टांशी वचनबद्ध आहे आणि सार्कने प्रादेशिक सहकार्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम करावे अशी पाकिस्तानची इच्छा आहे, असेही पाक परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशमधील सहकार्याबद्दल बोलताना चीन हा एक अतिशय महत्त्वाचा देश आहे. चीनचे बहुतेक दक्षिण आशियाई देशांशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत, असेही ते म्हणाले.