पुणे | धायरीतील खून प्रकरणात तिघांना कोठडी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – किरकोळ वादातून तरुणाला मारहाण करून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. धायरी फाटा येथे ही घटना घडली होती. मद्य प्राशनानंतर जेवणाच्या ताटात हात घातल्याने त्यांच्यात वाद झाले होते. यातून आरोपींनी हे कृत्य केले.
तरुणाचा खून का केला, याबाबत आरोपी उडवाउडवीची उत्तरे देत असून, त्यांनी नियोजनपूर्वक खून केला आहे का, त्यामागे त्यांचा उद्देश काय होता, तसेच अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत पोलीस तपास करत आहेत. आदित्य संतोष घोरपडे (वय २३, रा. गारमाळ, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी आकाश उर्फ नन्या राकेश शुक्ला उर्फ परदेशी (वय ३२), जगदीश राकेश शुक्ला (वय २१) आणि रोहन उर्फ मारी राजू शेळके (वय २५, तिघे रा. धायरी) यांना पोलीस कोठडी झाली आहे.
तर या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या दोन अल्पवयीन मुलांची रवानगी बाल निरीक्षणगृहात करण्याचे आदेश बाल न्याय मंडळाने दिले आहेत. मृत तरुणाच्या आईने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले. आरोपींनी खून करण्यासाठी वापरलेली रिक्षा कोठे लपवून ठेवली आहे,
तसेच मारहाण करण्यासाठी बांबू कोठून आणले, याबाबत चौकशी करायची आहे आणि न्यायवैद्यक पुरावे गोळा करायचे आहेत. त्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी अतुल भोस आणि सहायक सरकारी वकील बोधिनी शशिकला यांनी केली.




