पुणे | महिन्याला तीन गॅस सिलेंडर मिळणार मोफत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्ह्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे १ लाख ५४ हजार ५६० लाभार्थी तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थींच्या कुटुंबाला एका वर्षभरात तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
या ठिकाणी संपर्क साधा
जिल्ह्यातील अधिकाधिक पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, तहसील कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी, नजिकच्या रास्तभाव दुकान, गॅस वितरण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लाभार्थींची पात्रता
योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅसजोडणी महिलेच्या नावाने असावी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरीता पात्र ठरणारे लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे. शिधा पत्रिकेनुसार एका कुटुंबातील केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे.
सदरचा लाभ केवळ घरगुती वापराच्या १४.२ कि. ग्रॅ. वजनाच्या गॅस सिलिंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ १ जुलै २०२४ रोजी पासून देण्यात येणार आहे. त्यानंतर विभक्त करण्यात आलेल्या शिधापत्रिकातील कुटुंबास लाभ मिळणार नाही.
योजनेची कार्यपद्धती
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या ३ मोफत सिलिंडरचे तेल कंपन्यांमार्फत वितरण करण्यात येणार आहेत. सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या धर्तीवर अंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलिंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम सरासरी ८३० रुपये असून ती ग्राहकांकडून घेतली जाते.
त्यानंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येणारी ३०० रुपयाचे अनुदान थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.
त्याच धर्तीवर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेंतर्गत तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे ५३० रुपये प्रति सिलिंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करायची आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलिंडरसाठी अनुदान देण्यात येणार नाही.





