Mexico Victory Tragedy : फिफा विश्वचषकातील ऐतिहासिक विजयानंतर मेक्सिकोत माजला हाहाकार; जल्लोषादरम्यान चेंगराचेंगरीत ३ चाहत्यांचा गुदमरून मृत्यू
Mexico Victory Tragedy : मेक्सिको सिटीच्या रस्त्यांवर लाखो चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत आणि हवेअभावी गुदमरल्यामुळे ३ निष्पाप फुटबॉल चाहत्यांचा वेदनादायक मृत्यू झाला आहे.

Mexico vs Ecuador FIFA World Cup 2026 Stampede Three Fans Die Mexico City : सध्या जगभरात फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ चा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील ‘राउंड ऑफ ३२’ च्या एका अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात यजमान मेक्सिकोच्या संघाने इक्वाडोरवर २-० असा ऐतिहासिक विजय नोंदवला. या अविस्मरणीय विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचे उधाण आले होते. मात्र, या विजयाचा जल्लोष साजरा करत असतानाच मेक्सिकोमध्ये एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. मेक्सिको सिटीच्या रस्त्यांवर लाखो चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळल्याने झालेल्या चेंगराचेंगरीत आणि हवेअभावी गुदमरल्यामुळे ३ निष्पाप फुटबॉल चाहत्यांचा वेदनादायक मृत्यू झाला आहे.
१० लाख चाहते रस्त्यावर; ‘एंजेल ऑफ इंडिपेंडन्स’ बनले मानवी समुद्र –
मिळालेल्या माहितीनुसार, एस्टाडिओ अझ्टेका मैदानावर मेक्सिकोने इक्वाडोरचा पराभव करताच चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. संघाने ‘राउंड ऑफ १६’ मध्ये दणक्यात प्रवेश केल्याच्या आनंदात पासेओ डे ला रिफॉर्मा आणि आसपासच्या परिसरात तब्बल १० लाखांपेक्षा अधिक फुटबॉल चाहते रस्त्यावर उतरले. मेक्सिको सिटीचे ऐतिहासिक प्रतीक असलेल्या ‘एंजेल ऑफ इंडिपेंडन्स’ स्मारकासमोरील संपूर्ण परिसराला मानवी समुद्राचे स्वरूप आले होते.
या जल्लोषादरम्यान हॅम्बर्गो आणि लँकेस्टर रस्त्यांवर गर्दीचा दाब इतका वाढला की, लोकांना श्वास घेणे कठीण झाले. या प्रचंड चेंगराचेंगरीत गुदमरल्यामुळे तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एका ४४ वर्षीय पुरुषाचा आणि दोन महिलांचा (वय १९ आणि ४८ वर्षे) समावेश आहे. स्थानिक प्रशासनाने बुधवार, १ जुलै रोजी या दुःखद घटनेला अधिकृत दुजोरा दिला.
🇲🇽 TRAGEDIA EN LOS FESTEJOS DEL MUNDIAL: TRES MUERTOS EN CIUDAD DE MÉXICO
La celebración por la última victoria de México en el Mundial terminó en tragedia. Más de un millón de personas se congregaron en la capital y tres personas murieron por asfixia durante los festejos. pic.twitter.com/SicsGMBQWV
— Media Oriente (@MediaOriente) July 1, 2026
ऐतिहासिक विजयानंतर आनंदावर विरजण –
💔🇲🇽 La alegría por el triunfo del Tri terminó en tragedia.
La celebración por la victoria de México sobre Ecuador en el Mundial 2026 dejó un saldo de tres personas fallecidas por asfixia durante la concentración masiva en las inmediaciones del Ángel de la Independencia y Paseo… pic.twitter.com/GufnLtCkCB
— Moviendo Ideas (@moviendoideas) July 1, 2026
मेक्सिकोच्या संघाने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली होती. यापूर्वी १९८६ मध्ये मेक्सिकोने स्वतःच्या यजमानपदाखाली विश्वचषकाच्या बाद फेरीत बुल्गारियाचा पराभव केला होता. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी मेक्सिकोने नॉकआऊट सामन्यात विजय मिळवून नवा इतिहास रचला. संपूर्ण देश या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव साजरा करत असतानाच, या मृत्यूच्या बातमीने विजयाच्या जल्लोषावर विरजण पाडले आहे.
प्रशासनाकडून दुःख व्यक्त; काळजी घेण्याचे आवाहन –
या दुर्घटनेनंतर मेक्सिको सिटी सरकारच्या प्रमुख क्लारा ब्रुगाडा मोलिना यांनी एक्सवर पोस्ट करत दुःख व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, आपत्कालीन पथकांनी त्वरित धाव घेऊन वैद्यकीय उपचार सुरू केले, परंतु दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त करत नागरिकांना कोणताही उत्सव साजरा करताना जबाबदारी आणि काळजी बाळगण्याचे आवाहन केले आहे.





