Chhaya Kadam : “दररोज साडेतीन तास प्रोस्थेटिक मेकअप”; ‘जठाई’च्या भूमिकेसाठी छाया कदम यांनी घेतली प्रचंड मेहनत
Chhaya Kadam : ‘जठाई’ या रहस्यमय पात्राच्या पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे.

Chhaya Kadam : बहुचर्चित मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपट‘भूतम भयम्’ची प्रेक्षकांमध्ये सध्या मोठी उत्सुकता आहे. टीझरला मिळालेल्या दमदार प्रतिसादानंतर आता चित्रपटातील आणखी एका महत्त्वाच्या पात्राचा पहिला लूक समोर आला आहे. या लूकमध्ये दिसणारी अभिनेत्री कोण आहे, याची मोठी चर्चा झाली. अखेर ही अभिनेत्री आहे छाया कदम. जठाई या आव्हानात्मक भूमिकेत अभिनेत्री त्यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
‘जठाई’ या रहस्यमय पात्राच्या पोस्टरने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवली आहे. या पोस्टरमध्ये ‘जठाई’चं भयावह रूप पाहून अंगावर काटा येतो. भेदक नजर, विचित्र चेहऱ्याची ठेवण आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्वामुळे हे पोस्टर क्षणात लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे, या लूकमध्ये अभिनेत्री छाया कदम यांना ओळखणंसुद्धा कठीण झालं आहे. त्यांच्या कारकिर्दीतील ही आतापर्यंतची सर्वात वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका मानली जात आहे. ही भूमिका साकारण्यासाठी छाया कदम यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.
या भूमिकेबद्दल बोलताना छाया कदम म्हणाल्या, “कलाकार म्हणून मला नेहमीच वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याची इच्छा असते. ‘भूतम भयम्’मधील ‘जठाई’ ही माझ्या कारकिर्दीतील सर्वात वेगळ्या भूमिकांपैकी एक आहे. तिचं दिसणं, चालणं, बोलणं आणि हसणं या प्रत्येक गोष्टीसाठी मला विशेष मेहनत घ्यावी लागली. विशेष म्हणजे ती गिब्रिश भाषेत बोलते आणि ती भाषा आत्मसात करणं माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.”
हेही वाचा : Pushkar Jog : पुष्कर जोगच्या चित्रपटाचे युकेमध्ये शुटींग सुरू; ‘या’ अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रीन
त्या पुढे म्हणाल्या, “या भूमिकेसाठी दररोज साडेतीन तास प्रोस्थेटिक मेकअप करावा लागायचा आणि तो काढायलाही तितकाच वेळ लागायचा. जड मेकअप आणि वेशभूषेत काम करणं शारीरिकदृष्ट्याही कठीण होतं. मात्र संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे ‘जठाई’चं व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे साकारता आलं. हा लूक आणि ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील, असा मला विश्वास आहे.”
‘भूतम भयम्’चे लेखन व दिग्दर्शन रामचंद्र अरुण गांवकर यांनी केले आहे. चित्रपटात नव्या दमाच्या कलाकारांची मोठी फळी दिसणार आहे. करण सोनावणे, नील साळेकर, सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, मनमीत पेम आणि पुष्कराज चिरपुटकर या कलाकारांच्या लक्षवेधक भूमिका आहेत. हॉरर, कॉमेडी आणि रहस्याचा अनोखा संगम असलेला ‘भूतम भयम्’ येत्या २४ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : Vinayak Raut : सुनेच्या हादरवणाऱ्या आरोपानंतर खळबळ; विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया समोर, काय म्हणाले?





