‘Ek Hoti Malin’ Teaser : एका क्षणात संपूर्ण गाव उध्वस्त झालं! माळीणची गोष्ट मोठ्या पडद्यावर; थरारक टीझरने लक्ष वेधलं
'Ek Hoti Malin' Teaser : चित्रपटाचे छायांकन राजा फडतरे यांनी केले असून युवराज गोंगले यांनी गीतलेखनासह संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

‘Ek Hoti Malin’ Teaser : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावावर कोसळलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीची हृदयद्रावक सत्यकथा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. २०१४ मध्ये अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव दरडीखाली गाडले गेले आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झाले.
या अंगावर शहारे आणणाऱ्या सत्यघटनेवर आधारित ‘एक होतं माळीण’ हा मराठी चित्रपट येत्या २४ जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या चित्रपटाची निर्मिती ड्रीम डॉट क्रिएशन प्रोडक्शनच्या संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी केली असून रुपेश राणे, अरुण कोंजे, दत्तात्रय गायकर आणि राजू राणे हे सहनिर्माते आहेत. रॅन स्टुडिओज प्रोडक्शनतर्फे नंदू मेहेर, रुपेश राणे, अरुण कोंजे, अक्षय म्हात्रे आणि राजू राणे यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.
चित्रपटाची संकल्पना, कथा आणि पटकथा राजू राणे यांची असून दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटात प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक आणि अनुज ठाकरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा :Xi Jinping: “तैवानला चीनमध्ये विलीन करूनच शांत बसणार” ; शी जिनपिंग यांची पुन्हा एकदा कठोर भूमिका
चित्रपटाचे छायांकन राजा फडतरे यांनी केले असून युवराज गोंगले यांनी गीतलेखनासह संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी आणि हरिदास शिंदे यांच्या आवाजातील गाणी चित्रपटाला भावनिक उंची देतात. कला दिग्दर्शन नितेश नांदगावकर, व्हीएफएक्स रहमान अब्दुल्ला, तर कार्यकारी निर्माते महेश भारंबे आहेत.
विशेष म्हणजे, हा चित्रपट वास्तवाशी प्रामाणिक राहावा यासाठी दिग्दर्शक राजू राणे यांनी माळीण गावातील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अनुभवांच्या आधारे कथानक उभे केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण बदलापूर येथे करण्यात आले असून, कला दिग्दर्शक नितेश नांदगावकर यांनी उभारलेला माळीण गावाचा सेट विशेष आकर्षण ठरत आहे.
दमदार कलाकार, वास्तवदर्शी मांडणी, प्रभावी व्हीएफएक्स आणि हृदयस्पर्शी संगीत यांच्या जोरावर ‘एक होतं माळीण’ हा चित्रपट प्रेक्षकांना एका भयावह सत्यघटनेचा भावनिक आणि अस्वस्थ करणारा प्रवास अनुभवायला लावणार आहे. एका रात्रीत अनेकांचे संसार, स्वप्ने आणि आयुष्य वाहून नेणाऱ्या त्या काळ्याकुट्ट रात्रीची वेदना हा चित्रपट पुन्हा एकदा जिवंत करणार आहे.





