मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. लेडी डाॅन नावाच्या ट्विटरवर हॅंडलवरून ट्विट करत धमकी देण्यात आली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.
‘ओवेसी हे प्यादे आहेत, खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत’, असे या धमकीच्या ट्विटमध्ये लिहिले आहे. भाजपच्या सर्व वाहनांवर आरडीएक्सने हल्ला केला जाईल, असेही म्हटले आहे. तसेच, ‘तुमची टीम ठेवा. दिल्ली पाहू नका. योगी मारले जातील’, असे यूपी पोलिसांना टॅग करत पुढे लिहिलेले आहे.
अलिगड पोलिसांनाही टॅग करत योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचे लिहिले आहे. योगी आदित्यनाथ सूर्य पाहू शकणार नाहीत, असेही या धमकीच्या ट्विटमध्ये लिहिले आहे. उत्तर प्रदेशातील मेरठची रहिवासी सीमा सिंग मानवी बॉम्बच्या रूपात येऊन योगींना मारतील, असेही म्हटले आहे.
दरम्यान, या धमकीच्या ट्विटनंतर हापूड पोलिसांनी तपास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीसांनी कारवाई सुरू केल्यानंतर या नावाचे ट्विटर हँडल सध्या दिसत नाही. या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सायबर सेलकडे सोपवला आहे.





