ललित पाटील प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत – आमदार रवींद्र धंगेकर

पुणे – ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाचा सखोल तपास तातडीने झाला पाहिजे. या प्रकरणाचे धागेदोरे सरकारमधील मंत्र्यांपर्यंत पोहचलेले आहेत. त्यामुळे ललित पाटील याला संरक्षण देणाऱ्या ‘त्या’ मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज हिवाळी अधिवेशन प्रसंगी केली.
ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाचा काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर, मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडत आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीही त्यांनी ही भूमिका मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. आज काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने विधानभवनात झालेल्या निदर्शनावेळीही त्यांनी ‘या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करा’, अशी मागणी केली.
पुण्याचा लौकीक एक शांत व सुसंस्कृत शहर म्हणून सर्वत्र आहे. पण, या प्रकरणामुळे पुण्याची बदनामी होऊ लागली आहे. अनेक तरुण व्यसनाच्या आहारी जावू लागले आहेत. ही बदनामी रोखायची असेल, पुण्याचा लौकीक कायम ठेवायचा असेल तर या प्रकरणातील सर्व दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे. चौकशीत दोषी ठरलेले ‘ससून’चे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना सरकार का पाठीशी घालत आहे? त्यांना त्वरित अटक करावे, अशी मागणीही आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.
काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने विधानभवनात झालेल्या निदर्शनात आमदार रवींद्र धंगेकर हे आज पुन्हा एकदा डॉक्टरच्या वेशभूषेत दिसून आले. स्टेथोस्कोप आणि ॲप्रन घालून डॉक्टरच्या वेशभूषेत ते निदर्शनात सहभागी झाले. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, अंबादास दानवे यांच्यासह अनेक नेते यात सहभागी झाले होते.





