पुणे जिल्हा | विचार हे वैश्विक असले पाहिजेत -गोरे

लोणी काळभोर,(वार्ताहर) – जीवनाचे गुणगान गाणारे, माणसे समृद्ध करून त्यांना आत्मभान देणारे विचार साहित्यिक आणि विचारवंतांनी दिले पाहिजे. विचारांना कोणतीही सीमा न ठेवता ते वैश्विक असले पाहिजेत. प्रत्येक माणसाला ते विचार आपले वाटणारे असावेत.
शोषितांच्या, वंचितांच्या, स्त्रियांच्या आणि शेतकर्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाणे हे साहित्यिक आणि विचारवंतांचे लक्षण असते, असे विचार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी व्यक्त केले.
स्व. राजकुमार काळभोर यांच्या जयंतीनिमित्त तिसरे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. संमेलनाचे उद्घाटक शरद गोरे, स्वागताध्यक्ष किशोर टिळेकर, संमेलन अध्यक्षा वसुधा नाईक,
पुणे विभागीय अध्यक्ष आणि निमंत्रक सूर्यकांत नामुगडे, राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगी काळभोर, शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर, प्रा. सुरेश वाळेकर, ज्ञानेश्वर धायरीकर, नानाभाऊ माळी, फुलचंद नागटिळक, मधुकर गिलबिले, साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ इत्यादी मान्यवर मंचावर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. राजकुमार काळभोर यांच्या प्रतिमेचे आणि भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर समाजातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणार्या गुण कौशल्य धारकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
चित्रकार बजरंग पवार यांनी काढलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राचे अनावरण तसेच कवयित्री सिंधू साळेकर यांच्या कस्तुरी गंध या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या राज्यस्तरीय संमेलनासाठी महाराष्ट्राच्या बुलडाणा, सातारा, बारामती, मुंबई, नाशिक, राजगुरुनगर, रायगड, भोर, सोलापूर आणि पुणे अशा विविध शहरातून आलेल्या कवी कवयित्रींनी उत्स्फूर्तपणे आपल्या बहारदार काव्यरचना सादर करून सभागृहातील रसिकांचे मने जिंकली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत नामुगडे आणि विनोद अष्टुळ यांनी तर शुभांगी काळभोर यांनी उपस्थितांचे आभार मानले.





