Loni Kalbhor News : विद्यार्थ्यांचे ‘कचरा बंद’ आंदोलन ५ व्या दिवशीही सुरू! प्रशासनाकडून अद्याप तोडगा नाही
Loni Kalbhor News : पोलीस उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतरही नदीत कचरा टाकणे सुरूच; विद्यार्थ्यांनी कचरा वाहून नेणारे ट्रॅक्टर अडवून धरले, प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष.

Loni Kalbhor News – मुळा- मुठा नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून लोणी-काळभोर, कदमवाकवस्ती, परिसरातील काही गावांकडून दररोज कचरा टाकला जात असल्याच्या निषेधार्थ एमआयटी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे ‘कचरा बंद’ आंदोलन पाचव्या दिवशीही कायम आहे.
पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या याविरोधात विद्यार्थ्यांनी प्रथम (दि.४) विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ‘कचरा बंद’ आंदोलन करत कचरा वाहून नेणाऱ्या ग्रामपंचायतींच्या ट्रॅक्टरांना कॅम्पसमधून नदीपात्राकडे जाण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायतींना कचरा प्रश्न निकाली काढण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली होती.
मात्र, मुदत संपूनही नदीपात्रात कचरा टाकणे सुरूच राहिल्याने विद्यार्थ्यांनी पुन्हा (दि.१३) आंदोलन छेडत नदीपात्राकडे जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर अडविले. आंदोलनालापाच दिवस उलटूनही तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप कायम आहे. (दि.२६) फेब्रुवारी रोजी नदीपात्रातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना भीषण आग लागली होती.
सलग चार दिवस ही आग धुमसत राहिल्याने परिसरात प्रचंड विषारी धूर पसरला. त्यामुळे एमआयटी शैक्षणिक संकुलातील ६ ते ७ विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास व गुदमरल्याची लक्षणे जाणवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाली. हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने, लोणी-काळभोरचे अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, दोन्ही ग्रामपंचायतींचे माजी सरपंच व ग्रामसेवक यांनी नदीत थेट टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली.
मात्र, गंभीर प्रश्नावर अद्यापही ठोस तोडगा निघाला नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर हवेलीचे गटविकास अधिकारी शेखर शेलार यांनी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतींना नोटीस बजावत शास्त्रोक्त पद्धतीने कचरा व्यवस्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुळा मुठा नदीपात्रात कचरा टाकण्यास त्वरित बंदी घालत तातडीने पर्यायी जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश दिले आहेत.
“नदीपात्रात कचरा टाकणे चुकीची गोष्ट आहे. या गंभीर प्रश्नावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने ग्रामसभेत सर्वानुमते घेतलेले ठराव स्तुत्य आहेत. याबद्दल त्यांचे आभार. लोणी-काळभोर ग्रामपंचायतदेखील या प्रश्नी लवकरच सामंजस्याची भूमिका घेऊन ग्रामसभा आयोजित करून पर्यायी व्यवस्था करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”
– डॉ. महेश चोपडे, कुलसचिव, एमआयटी एडीटी विद्यापीठ, लोणी काळभोर.






