Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापतींची निवड २ एप्रिल रोजी होणार असून, त्याआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः समाजकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी हवेली तालुक्यातील इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. मात्र, यंदाही हवेली तालुक्याला डावलले जाणार का, असा सवाल स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. समाजकल्याण सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोणी काळभोर गटातील शीतल कांबळे आणि उरुळी कांचन गटातील जितेंद्र बडेकर ही दोन नावे आघाडीवर आहेत. दोघेही पक्षांतर्गत पाठबळ मिळवण्यासाठी प्रयत्नशील असून, अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. दुपारी ३ वाजता छाननी होईल, त्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांचा अवधी दिला जाणार असून, आवश्यक असल्यास मतदान होणार आहे. हवेलीला कायम दुय्यम स्थान – हवेली तालुका हा लोकसंख्येच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा तालुका मानला जातो. तरीदेखील, जिल्हा परिषदेमधील सभापती पदांच्या वाटपात हवेलीला कायम दुय्यम स्थान मिळत असल्याची भावना स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महत्त्वाच्या समित्यांपासून हवेलीच्या प्रतिनिधींना दूर ठेवण्यात आल्याबद्दल नाराजी वाढत आहे. यंदा तरी किमान एक समिती हवेलीच्या वाट्याला यावी, अशी मागणी स्थानिक सदस्य आणि कार्यकर्त्यांकडून जोर धरत आहे. त्यासाठी जोरदार लॉबिंगही सुरू आहे. मात्र, सभापती पदांच्या वाटपात राजकीय समीकरणे, पक्षनिहाय ताकद आणि वरिष्ठ नेत्यांचे निर्देश यांना महत्त्व दिले जात असल्याने हवेलीला संधी मिळेलच, याबाबत अनिश्चितता कायम आहे. यंदा तरी अन्याय दूर व्हावा – नुकत्याच झालेल्या सदस्य निवडीमुळे जिल्हा परिषदेमधील सत्तासमीकरणांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे कोणत्या गटाला प्राधान्य मिळते, यावरही या निवडीचा परिणाम होणार आहे. समाजकल्याण समितीचे सभापतिपद हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात असल्याने या पदासाठी चुरस वाढली आहे. “हवेलीला कायम डावलले जाते, हा अन्याय यंदा तरी दूर व्हायला हवा,” अशी भावना स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. आता २ एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीत हवेली तालुक्याच्या वाट्याला काय येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.