ज्यांची 11 रुपयांची लायकी नाही आणि त्यांच्याकडून.. काँग्रेसचा संजय गायकवाडांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. राहुल गांधी यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार असे आमदार संजय गायकवाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.
काँग्रेसने दिले प्रत्युत्तर
“ज्यांची अकरा रुपयांची लायकी नाही ते संजय गायकवाड अकरा लाखाचे बक्षीस देण्याची भाषा करत आहेत”, असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष सोनल घाग यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
वक्तव्याची गृहखात्याने दखल घ्यावी
राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याची गृहखात्याने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीदेखील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी केली आहे.
काय म्हणाले होते संजय गायकवाड ?
जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे. राहुल गांधी हे जे शब्द बोलले की, आम्हाला आरक्षण संपवायचंय. माझं आवाहन आहे की, जो राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस मी माझ्या वतीनं देईल असे संजय गायकवाड म्हणाले.





