Thomas Partey Visa : क्रीडा जगतात मोठी खळबळ! गुन्हेगारी आरोपांमुळे स्टार खेळाडूचा फिफा विश्वचषकासाठी व्हिसा नाकारला
Thomas Partey Visa : घाना संघाचा मुख्य आधारस्तंभ आणि स्टार मिडफील्डर थॉमस पार्टे (Thomas Partey) याला कॅनडा सरकारने व्हिसा (Visa) देण्यास साफ नकार दिला आहे.

Thomas Partey Visa Denied Canada FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेचा थरार सुरू झाला असून घाना या राष्ट्रीय फुटबॉल संघाला पहिल्या सामन्यापूर्वीच एक अत्यंत मोठा आणि अनपेक्षित झटका बसला आहे. संघाचा मुख्य आधारस्तंभ आणि स्टार मिडफील्डर थॉमस पार्टे (Thomas Partey) याला कॅनडा सरकारने व्हिसा (Visa) देण्यास साफ नकार दिला आहे. कॅनडाच्या या कठोर भूमिकेमुळे टोरंटो येथे पनामाविरुद्ध होणाऱ्या घानाच्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्वचषक सामन्यात थॉमस पार्टे खेळू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (‘फिफा’) अधिकृत पत्रक जारी करून थॉमस पार्टेचा व्हिसा अर्ज कॅनडा सरकारने फेटाळल्याची पुष्टी केली आहे.
गंभीर कायदेशीर खटल्याची पार्श्वभूमी!
३२ वर्षीय थॉमस पार्टे सध्या एका अत्यंत गंभीर कायदेशीर वादात अडकला आहे. २०२० ते २०२५ दरम्यान इंग्लंडच्या प्रसिद्ध ‘आर्सेनल’ क्लबकडून खेळत असताना त्याच्यावर बलात्काराचे अनेक गंभीर आरोप झाले होते, ज्याचा खटला सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार आहे.
FIFA have confirmed that Ghana midfielder Thomas Partey will be unable to play in Ghana’s opening game against Panama in Toronto next Wednesday because the Canadian government have decided not to issue him with a visa. pic.twitter.com/i1mQc4cGS3
— Sky Sports News (@SkySportsNews) June 12, 2026
पार्टेने हे सर्व आरोप फेटाळून लावले असले, तरी याच गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कॅनडा सरकारने त्याला देशात प्रवेश नाकारल्याचा अंदाज आहे. सध्या तो स्पेनच्या ‘विलारियल’ क्लबकडून खेळतो. विशेष म्हणजे, मोरोक्कोचा स्टार डिफेंडर अचराफ हकीमी हा देखील फ्रान्समध्ये अशाच प्रकारच्या खटल्याला सामोरे जात आहे.
पूर्ण वर्ल्ड कपमधून बाहेर नाही; अमेरिकेत खेळणार!
“I’m very disappointed in the behavior of FIFA in handling situations that have arisen as part of the 2026 World Cup. I think they have poorly handled a lot of things”
—The Minister for Sports and Recreation, Kofi Adams, has expressed disappointment with FIFA over its handling… pic.twitter.com/qS1wi7uaTf
— SIKAOFFICIAL🦍 (@SIKAOFFICIAL1) June 13, 2026
कॅनडाने व्हिसा नाकारल्यानंतर थॉमस पार्टे अमेरिकेच्या रोड आयलंड येथील घाना संघाच्या बेस कॅम्पमध्ये परतला आहे. पहिल्या सामन्याला मुकणार असला तरी तो वर्ल्ड कपमधून पूर्णपणे बाहेर झालेला नाही. घानाचे पुढील सामने अमेरिकेत होणार आहेत. त्यानुसार, २३ जून रोजी इंग्लंडविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी आणि २७ जून रोजी क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यासाठी तो संघात उपलब्ध असेल. घानाचा संघ गेल्या ६ पैकी ५ वर्ल्ड कपसाठी पात्र ठरला असून पहिल्याच सामन्यात त्यांच्या मुख्य खेळाडूचे नसणे ही संघासाठी मोठी कोंडी ठरणार आहे.





