“महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असेल”; नाना पटोले यांचा दावा

Nana Patole : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. येत्या 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी नाना पटोले यांनी या सरकारचे नागपूर येथील अधिवेशन हे शेवटचे असेल, असे म्हंटले आहे. नाना पटोले यांच्या या विधानानंतर विरोधक सरकारलाला विविध मुद्यांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे.
काय म्हणाले नाना पटोले ?
“या सरकारचे नागपूर येथील अधिवेशन हे शेवटचे असेल. पुढचं नवीन सरकार येईल त्याच पहिला अधिवेशन पुढे होईल. पूर येवो अथवा शेतकरी आत्महत्या करो. महायुती सरकारला काहीही देणेघेणे नाही. आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे महायुतीचे नेते वारंवार सांगतात. प्रत्यक्षात मात्र तसे काहीही होत नाही. नागपुरात मोठा पूर आला त्याची मदत सुद्धा अजूनपर्यंत लोकांना मिळाली नाही.”
“हे सरकार सध्या निवडणुका घ्यायला तयार नाही. नागपूरचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे विधानसभेवर हल्लाबोल करण्याची रणनीती आम्ही ठरवलेली आहे. सगळेच प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही घेणार आहे. विदर्भातील अनेक मुद्दे आहेत. शेतकऱ्यांना पावसाची मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या अधिकाराची लढाई काँग्रेस पक्ष लढेल, त्यासाठी ११ तारखेला नागपुरात मोठा आंदोलन करण्यात येणार आहे. अधिवेशनादरम्यान हे आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिला
विविध प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या काळात ११ तारखेला काँग्रेस पक्ष हल्लाबोल मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा थेट विधिमंडळावर धडकणार आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, महागाई, पावसामुळे नुकसान झालेल्यांना मदत करण्याबाबत राज्य सरकारची उदासीन भूमिका आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरता काँग्रेस हिवाळी अधिवेशनात हल्लाबोल आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांना जे राज्यभरात नुकसान झालं आहे. ते प्रश्न आम्ही मांडणार आहे.” या आंदोलनाला राज्यभरातून लाखो लोक येणार असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले.





