गुरू ग्रहाच्या चंद्रावरची जीवसृष्टी शोधायला निघालंय हे यान

वॉशिंग्टन । विश्वामध्ये पृथ्वीबाहेर कुठे जीवसृष्टी आहे काया प्रश्नाच्या शोधात काही अंतराळ मोहिमाही केल्या आहेत.आता गुरू ग्रहाच्या युरोपा नावाच्या चंद्राच्या दिशेने नासाचं युरोपा क्लिपर हे अंतराळ यान झेपावले आहे युरोपावर जीवसृष्टी निर्माण होण्याजोगी परिस्थिती आहे का, हे या मोहिमेद्वारे शोधलं जाईल.
पृथ्वीपासून 1.8 अब्ज मैलांचं अंतर पार करत हे यान गुरूच्या युरोपा या चंद्रापर्यंत पोहोचेल. गुरू या ग्रहाला इंटरनॅशनल अॅस्ट्रोनॉमिकल युनियनने अधिकृत मान्यता दिलेले तब्बल 95 चंद्र आहेत.या प्रचंड मोठ्या ग्रहाच्या कक्षेमध्ये हजारो लहान गोष्टी आहेत. या 95 चंद्रांपैकी सगळ्यात मोठे 4 चंद्र हे आपल्या पृथ्वीच्या चंद्रानंतर शोध लागलेले दुसऱ्या ग्रहांचे चंद्र होते.नासाने लाँच केलेलं युरोपा क्लिपर यान 2030 साली तिथे पोहोचेल.या युरोपाच्या पृष्ठभागाखाली प्रचंड मोठा समुद्र असून हे प्रमाण पृथ्वीवरच्या एकूण पाण्याच्या दुप्पट असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
पृथ्वीपासून 62.8 कोटी किलोमीटर्सच्या अंतरावर असणारा हा युरोपा, आपल्या पृथ्वीच्या चंद्रापेक्षा थोडासाच मोठा आहे. पण जर हा युरोपा आपल्या आकाशात असता, तर आपल्या चंद्राच्या तुलनेत पाचपट अधिक मोठा दिसला असता. कारण त्यावर गोठलेल्या स्वरूपातलं इतकं पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने अधिक सूर्यप्रकाश परावर्तित झाला असता.या युरोपाचं बर्फाळ कवच सुमारे 25 किलोमीटर जाडीचं आहे. आणि या कवचाखाली खाऱ्या पाण्याचा मोठा समुद्र असण्याचा अंदाज आहे. शिवाय इथे अशीही काही रसायनं असू शकतात जी जीवसृष्टीसाठी गरजेची असतात.
युरोपावर कदाचित जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण असू शकते हे संशोधकांच्या लक्षात आलं 1970च्या दशकात. अॅरिझोनातून या युरोपा चंद्रांचं निरीक्षण करणाऱ्या वैज्ञानिकांना गोठलेलं पाणी दिसलं.त्यानंतर 1995 मध्ये जेव्हा नासाचं गॅलिलिओ यान युरोपाच्या जवळून गेलं तेव्हा या यानाने क्लिक केलेले फोटो संशोधकांना बुचकळ्यात टाकणारे होते.कारण या फोटोमध्ये दिसणाऱ्या पृष्ठभागावर गडद, लालसर – तपकिरी रंगाचे तडे होते. या भेगांमध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम यासारखी जीवसृष्टीसाठी पोषक ठरणारी रसायनं असण्याची शक्यता आहे.
पण यापैकी कोणतीच मोहीम युरोपाच्या इतकी जवळ गेली नाही ज्याद्वारे या गोष्टींचा सखल अभ्यास करता येईल.त्यामुळेच आता नासाच्या या क्लिपर यानावरच्या उपकरणांच्या मदतीने संपूर्ण युरोपा चंद्राची पाहणी करता येईल, इथल्या धुळीचे कण गोळा करता येतील आणि या पाण्याच्या तुषारांमधूनही जाता येईल अशी
नासाने कोणत्याही प्लॅनेटरी मिशनसाठी उभारलेल्या आजवरच्या यानांच्या तुलनेत युरोपा क्लिपर हे सर्वात मोठं अंतराळयान आहे.याचं वजन आहे 13,000 पाऊंड म्हणजे 6.5 टन. म्हणजे एखाद्या पूर्व वाढ झालेल्या आफ्रिकन हत्तीच्या वजनाएवढं. आणि यानाच्या सोलर पॅनलची एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतची लांबी आहे 30 मीटर्स..
गुरू ग्रहाभोवतीचं रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्गाचं प्रमाण भयानक आहे. आणि युरोपा याच पट्ट्यात आहे. याच रेडिएशनपासून सुरक्षित राहण्यासाठी हे यान गुरू ग्रहाला घिरट्या घालेल आणि त्या दरम्यान युरोपाचा अभ्यास करेल. शिवाय किरणोत्सर्गापासून उपकरणांचं नुकसान होऊ नये म्हणून कंम्प्युटर आणि इतर गोष्टी अॅल्युमिनियमच्या एका व्हॉल्टमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.





