हिमाचल प्रदेशातील या ठिकाणी होते उन्हाळ्यातही बर्फवृष्टी

13050 फूट उंचीवरील रोहतांग खोरे देशभरातील पर्यटकांना कायम खुणावत असते. याठिकाणी पर्यटकांना मे-जून महिन्यातदेखील बर्फवृष्टीचा आऩंद लुटता येतो. खरं तर शिंकुला आणि बारालाचा ही ठिकाणे यापेक्षा उंचावर आहेत. मात्र, त्याठिकाणी रोहतांगप्रमाणे निसर्गसौंदर्य आणि बर्फवृष्टीचा अनुभव या काळात घेता येत नाही. रोहतांग खोऱ्यात सकाळी आल्हाददायक उन पडलेले असते.
दुपारी ढग दाटून येतात आणि काही वेळातच बर्फवृष्टीला सुरवात होते. यामुळे रोहतांग खोऱ्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, रोज याठिकाणी पर्यटकांना घेऊन येणारी चार हजार वाहने येऊ लागली आहेत. या भागातील निसर्ग आणि पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होऊ नये म्हणून राष्ट्रीय हरीत प्राधिकरणाने रोज फक्त 1200 वाहनांना परवानगी दिलेली आहे. असे असले तरी अटल बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने पर्यटकांना आता शिंकुला, बारालाचा, जांस्कर, चंद्रताल आणि कुंजम अशा नव्या पर्यटनस्थळांना सहजपणे जाता येते. एवढी पर्यटनस्थळे उपलब्ध असतानाही रोहतांग खोऱ्याचे आकर्षण कमी झालेले नाही.
गेली दोन वर्षे उन्हाळ्यातील पर्यटनाचा हंगाम करोनामुळे वाया गेला आणि स्थानिक व्यावसायिकांना त्याचा मोठा फटका बसला. यंदा पर्यटन व्यवसायाचा जम बसत आहे असे चित्र आहे. 15 मे नंतर या परिसरात पर्यटकांची संख्या वाढू लागेल. सध्या तरी रोहतांग खोऱ्याला पर्यटकांची पहिली पसंती असते. परंतु वाहनांच्या संख्येवर मर्यादा असल्याने पर्यटकांची संख्याही मर्यादित राहिल अशी चिन्हे आहेत.





