Nitin Naveen – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत काँग्रेस नेत्यांचे शब्द हे त्यांची अराजकवादी मानसिकता आणि चारित्र्य स्पष्टपणे दर्शवतात. ही टिप्पणी देशातील १४० कोटी जनतेचा अपमान असून राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, अशा शब्दांत भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी पलटवार केला. तसेच भारतीय राजकारणातील राहू असे त्यांना संबोधत निशाणा साधला. नितीन नवीन म्हणाले, भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार राहू हा अनेकजण एक अशुभ छायाग्रह मानतात. जो गोंधळ आणि अडथळे निर्माण करतो. त्यांनी जे विधान केले आहे, त्यातून त्यांची अराजकवादी मानसिकता आणि चारित्र्य स्पष्टपणे दिसून येते. तसेच, निवडणुकीत आपल्या पक्षाला मिळत असलेल्या पराभवांमुळे आलेली त्यांची हताशा आणि निराशाही या टिप्पणीतून व्यक्त होते. तसेच काँग्रेस नेते आपल्या मानसिकतेने आणि वर्तनाने देशातील राजकीय वातावरण दूषित आणि कलुषित करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकार भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलता या धोरणाने काम करत आहे. तसेच मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची भूमी सुरक्षित झाली असून जनतेचा अंतरात्माही अधिक बळकट झाला आहे, असेही ते म्हणाले.