“हे तर असंवेदनशील ‘ईडी’चे सरकार” ; खासदार सुप्रिया सुळे यांची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका

दौंड – फडणवीस – शिंदे हे अतिशय असंवेदनशील असे ईडीचे सरकार आहे. पक्ष फोडणे, लोकांना दमदाटी करणे यामध्ये ते व्यस्त आहे. सर्वसामान्य जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना समजत नाहीत, अशी खोचक टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर असताना दौंड तहसील कार्यालयात आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होत्या.
याप्रसंगी जिल्हा बॅंकेचे संचालक रमेश थोरात, तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, सोहेल खान आदी उपस्थित होते.
यावेळी त्या म्हणाल्या की, महिलांच्या बाबतीत बोलताना राज्यातील सर्वच आमदारांनी त्यांचा मान सन्मान राखूनच वक्तव्य करावेत. महिलांचा मान सन्मान राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत बोलताना जे ठेकेदार खराब काम करीत असतात त्यांना ब्लॅक लिस्ट करावे. राज्यातील सत्ता पाडण्यामध्ये खूप घाई करून त्यानंतर एक महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला मात्र अजूनही पालकमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक लागला आहे. देशात सध्या जो सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलतो त्यांच्यावर छापे पडतात. त्या नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.
मोहित कंबोज यांनी बारामती ऍग्रोबाबत केलेल्या ट्विट बाबत खासदार सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की , मी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात व्यस्त आहे. मुंबईत काय चालते याची मला कल्पना नाही. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आणि बारामती जिंकण्याच्या उद्देशाने आढावा बैठकीसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात येणार असल्याबाबत त्यांना विचारले असता खासदार सुळे म्हणाल्या की , देशाच्या अर्थमंत्री या बारामतीत येत असतील व मी मतदार संघात असेल तर मी त्यांचे स्वागतच करेल.





