कोकणातील ‘हा’ महत्त्वाचा घाट वाहतुकीसाठी खुला; प्रवास होणार आणखी आरामदायी

रायगड : उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जाणाऱ्या कोकणवासीयांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील दुसऱ्या बोगद्यात 15 मे रोजी वीजपुरवठा सुरू झाल्याने तो पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लोकांचा प्रवास आरामदायी होणार आहे. हा घाट बोगदा हा दोन किलोमीटर लांबीचा असून, त्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे.
कशेडी घाटातील दोन्ही बोगद्यांतील अंतर्गत गळती दुरुस्त करण्याचे काम होते. 15 मेपूर्वी वाहतुकीसाठी ते पूर्ण क्षमतेने खुले करण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यादृष्टीने बोगद्याचे काम सुरू होते. आता अखेर बोगद्यातील वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. या बोगद्यामुळे आता 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत होणार आहे.
बोगद्यात दोन्ही बाजूंनी 200 पथदीपांची उभारणी करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे. या पैकी बहुतांशी काम पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत प्रवास अधिक सुकर होणार आहे. आता मुंबईकडे येणाऱ्या बोगद्याप्रमाणेच रत्नागिरीकडे जाणाऱ्या बोगद्यातही वीज यंत्रणा सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुसाट होणार आहे.





