Maharashtra Politics : कोकणातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील युवासेनेचे आक्रमक नेते उमेश खताते यांनी पक्षाला रामराम ठोकत शेकडो कार्यकर्त्यांसह बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उमेश खताते हे आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे खेर्डी परिसरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.

उमेश खताते हे युवासेनेचे माजी तालुकाप्रमुख असून स्थानिक पातळीवर सक्रिय आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. खेर्डी परिसरात पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
खताते यांच्या या पक्षांतरामुळे रत्नागिरीतील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच स्थानिक राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढणार असून ठाकरे गटाला मोठा फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.