Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry : शिमगोत्सवानिमित्त कोकणवासीयांसाठी रो-रो सेवा; पहिल्याच दिवशी प्रवाशांचा हिरमोड
Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry : भरमसाठ तिकीट दर आणि बोटीवरील महागडी खानपान सेवा यामुळे प्रवास ठरला महागडा

Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मुंबई-विजयदुर्ग रो-रो जलवाहतूक सेवेचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. मुंबई ते कोकण प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई ते विजयदुर्ग रो रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर कोकणातील शिमग्याच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू झाली आहे.
तब्बल ४५ वर्षानंतर विजयदुर्गवरून प्रवासी बोट मुंबईवरून विजयदुर्ग जेट्टीवर येणार असल्याने नागरिकांनी मोठ्या संख्येने जेट्टीवर गर्दी केली होती. ढोल ताशाच्या तलावर बोटीचे आणि प्रवाशांचे स्वागत यावेळी स्थानिकांनी केले. मुंबई ते विजयदुर्ग प्रवास वातानुकूलित अत्याधुनिक बोटीतून करता येणार असल्याने प्रवाशांमध्ये उत्साह होता.
माल वाहतुकीसाठी देखील हा मार्ग अधिक उपयुक्त
रो-पॅक्स सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाभूत सुविधा आणि सागरी विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानली जाते. राज्यातील सागरी वाहतूक अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कोकण आणि मुंबई यांना अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी जलवाहतूक हा सर्वोत्तम पर्याय आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचतील, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
‘रो-पॅक्स सेवेमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही, तर कोकणातील पर्यटन, मत्स्यव्यवसाय, स्थानिक व्यापार आणि उद्योगधंद्यांना मोठी चालना मिळणार आहे. पर्यटन क्षेत्रात वाढ होऊन स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच माल वाहतुकीसाठी हा मार्ग अधिक उपयुक्त ठरणार आहे. कोकणातील नागरिकांसाठी आणि विशेषतः मुंबईत वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरणार आहे’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry :
वेळेची मोठी बचत होणार
शिमगोत्सवासाठी कोकणवासीयांनी रो-रो प्रवासी बोटीने प्रवासास पसंती दिली. रविवारी दुपारि ४.२० मिनिटांनी पहिली रो-रो बोट सेवा विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. यावेळी नागरिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास अवघ्या सहा ते सात तासांत पूर्ण होणार असल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे.
मात्र असे असताना जलमार्गावरील वाहतूक कोंडीमुळे दीड तासाचा विलंब झाला. दुपारी ३ वाजता विजयदुर्गला बोट पोहचणे अपेक्षित असताना बोट दुपारी ४.३० वाजता पोहचली. तर दुसरीकडे भरमसाठ तिकीट दर आणि बोटीवरील महागडी खानपान सेवा यामुळे प्रवास महागडा ठरल्यानेही प्रवाशांचा काहीसा हिरमोड झाला.
त्यात बोटीवर मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशांना मोबाईलचा वापर करता आला नाही. नेटवर्क नसल्याने डिजिटल पेमेंटचा पर्याय उपलब्ध झाला नाही. ही सेवा कायमस्वरूपी ठेवायची असेल, त्याला प्रतिसाद वाढवायचा असेल तर तिकीट दर कमी करणे आवश्यक असल्याचे सांगून प्रवाशांनी तिकीट दर कमी करण्याची मागणी केली. आता या मागणीचा राज्य सरकार आणि सागरी मंडळाकडून विचार करून काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल. Mumbai-Vijaydurg Ro-Ro Ferry :
हेही वाचा:






