‘या सरकारचे डेथ वॉरंट तयार…’; संजय राऊतांचा घणाघात

जळगाव – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार असून येत्या पंधरा दिवसात त्यावर स्वाक्षरी होऊन हे सरकार सत्तेवरून जाईल असा दावा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते आज येथे पत्रकारांशी बोलत होते. आज या जिल्ह्यातील पाचोरा येथे ठाकरे गटाची महासभा होणार आहे. त्याच्या तयारीसाठी संजय राऊत हे गेले दोन दिवस येथे आहेत. त्यानिमीत्त आज ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असे विखे पाटील म्हणाले आहेत. त्यावर राऊत म्हणाले की लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्या बरोबर असे योग्य नाही. तुमच्या मनात एक जण असेल आणि तुम्ही प्रत्यक्षात दुसऱ्या बरोबर नांदत असाल तर हा व्याभीचार ठरतो. ते म्हणाले की विखे पाटील यांच्या मनात नेहमीच गोंधळ असतो.
आधी ते शिवसेनेत होते त्यानंतर ते कॉंग्रेस मध्ये गेले आता ते भाजपबरोबर आहेत. उद्या सत्ता पालट झाल्यास राधाकृष्ण विखे पाटील आणखी कोणत्या तरी पक्षात जातील अशी टिप्पणीही त्यांनी केली. करोना काळात जळगावचे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी चारशे कोटी रूपयांचा घोटाळा केला असून त्याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत असेही राऊत यांनी यावेळी सांगितले.





