Kaka Pawar : ‘ही’ संपूर्ण घटना म्हणजे खेळांडूसोबत राजकीय खेळी: वस्ताद काका पवार; निर्णयाला दर्शवला विरोध

पुणेः अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी ठरला. मात्र, त्या आधी झालेला राडा संबंध महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला. शिवराज राक्षेची पाठ टेकली का? या एका प्रश्नावर महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे. पंचाने दिलेल्या निर्णयावर शिवराज राक्षे आक्षेप घेतला. त्याच्याकडून पंचांची कॅालर धरून त्यानंतर त्यांना लाथ मारण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर कारवाई करत त्यांना तीन वर्षांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळण्यावर बंधी घालण्यात आली आहे. या निर्णयाचा विरोध कुस्तीगीर वस्ताद काका पवार यांनी दर्शविला असून इंडिया महासंघाकडे (फेडरेशन) दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कालची कुस्ती चितपट झालीच नाही
कालची कुस्ती चितपट झालीच नाही. दोन्ही खांदे जमिनीला टेकले असते, तरच कुस्ती चितपट ठरली असती. येथे मोठी चूक पंचांनी केली आहे. त्या रेफरीला १० वर्षांसाठी कुस्तीमधून निलंबित केले पाहिजे. आम्ही फेडरेशनसमोर जाऊन सत्य उघड करण्यास तयार आहोत. जर त्यांनी आमच्या विरोधात निर्णय दिला, तर आम्ही तो मान्य करू, पण या निलंबनाविरोधात आम्ही ऑल इंडिया फेडरेशनकडे न्याय मागू, तिथे न्याय मिळाला नाही, तर आम्ही थेट वर्ल्ड रेसलिंग फेडरेशनकडे जाऊ, अशी भूमिका काका पवार यांनी मांडली आहे.
खेळांडूसोबत राजकीय खेळी
ही संपूर्ण घटना म्हणजे खेळाडूंसोबत राजकीय खेळी असल्याचे पवार म्हणाले आहेत. पण खेळाडूंसोबत राजकारण करू नका. शिवराज राक्षे आमचाच आहे, पृथ्वीराजही आमचाच आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील खेळाडू आमचेच आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन काका पवारांनी केले आहे. यामुळे महाराष्ट्र केसरीचा मान जरी पृथ्वीराज मोहोळ याला मिळाला असला तरी नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र केसरीसाठी पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात चुरशीचा कुस्तीचा सामना रंगला होता. पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे या दोन्ही खेळाडू आमने सामने आले होते. कुस्ती सुरू होताच पृथ्वीराजने डाव टाकला आणि शिवराजला जमिनीवर खाली पाडत चितपट केले, असा निर्णय पंचानी घेतला आणि पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आले. मात्र, माझी पाठ जमिनीला समांतर टेकलीच नव्हती असा आक्षेप शिवराजने घेतला. तसेच याची व्हिडिओ दाखवण्याची मागणी केली. यानंतर मोठा राडा झाला आणि वादावादीत शिवराजने पंचाची कॅालर धऱत लाथ मारली. याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहे. यानंतर याप्रकरणी सर्व स्तरावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.





