Sanjay Raut : हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य; संजय राऊतांची भैय्याजी जोशींवर टीका

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राजकीय वाद निर्माण झाला आहे. मुंबईत मराठी शिकणे गरजेची नसल्याचे वक्तव्य संघाचे भैय्याजी जोशी यांनी केले होते. त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. भैय्याजी जोशी यांचे वक्तव्य हे औरंगजेबापेक्षाही भयंकर कृत्य असल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संघाचा निषेध करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
मुंबईत मराठी आणि अमराठीचा वाद सुरू आहे. मराठी माणसांना घरे नाकारणे, त्यांच्यावर बंधने घालण्यापासून ते कार्यक्रम साजरे करण्यास मज्जाव करण्यापर्यंतचे वाद मागील काही महिन्यांमध्ये समोर आले आहेत. त्यातच आता भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याने नवा वाद सुरू झाला आहे. संजय राऊत म्हणाले, भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी शिकणे गरजेचे नाही असे सांगतात. असेच वक्तव्य इतर राज्यात करण्याची हिंमत भैय्याजी जोशी यांच्यात आहे का, असा रोखठोक सवाल त्यांनी केला.
राज्याच्या मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कसे सहन करता? असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्राच्या राजधानीत येऊन ते सांगत आहेत, या भागाची भाषा मराठी नाही. जर आमची भाषा राष्ट्रभाषा आहे तर हा गुन्हा राजद्रोहात बसतो, अशा शब्दात त्यांनी संताप व्यक्त केला. भैय्याजी जोशींच्या वक्तव्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील 106 हुताम्यांचा अपमान झाला असल्याचे राऊत यांनी म्हटले.





