सलग तीस वर्षे नगरसेवक कार्यसम्राट आबा बागुल!

पुणे महानगरपालिका कॉंग्रेस पक्ष गटनेते उल्हास ऊर्फ आबा बागुल यांचा 13 सप्टेंबर हा जन्मदिन! पुणे महानगरपालिकेत तब्बल गेली तीस वर्षे कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून येणारे आबा बागुल हे लौकिक अर्थाने विक्रमवीरच मानावे लागतील. 1992 मध्ये एकसदस्यीय वॉर्ड असताना ते प्रथम शिवदर्शन भागातून निवडून आले.
त्यानंतर दोन, तीन अथवा चार सदस्यीय प्रभाग झाले. मतदारसंघ बदलत गेले तरी आबा बागुल प्रत्येक वेळी मताधिक्य वाढवत निवडून येत राहिले. ही कौतुकाची बाब आहेच शिवाय सलग तीस वर्षे मतदारांच्या हृदयात स्थान कायम टिकवणे अतिशय अवघड असते, तरीही आबा बागुलांनी ते साध्य केले. त्यातूनच या कार्यसम्राट लोकसेवकाचे वेगळेपण उठून दिसते.
खासदार सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वाखाली 1992 पासून कॉंग्रेस पक्षाकडे पुणे महानगरपालिकेची सत्ता राहिली. आबा बागुलांचीदेखील नगरसेवक म्हणून ही पहिलीच टर्म होती. मात्र, अतिशय अभ्यासू आणि जनतेत मिसळून त्यांच्या नागरी हिताची कामे करण्याचा सपाटा लावण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे अल्पावधीतच ते नेत्यांच्या आणि जनतेच्याही गळ्यातले ताईत बनले. तेव्हा पहाटे सहा वाजता शिवदर्शन वॉर्डात अनवाणी फिरणारे कदाचित ते एकमेवच नगरसेवक होते.
याबद्दल विचारले असता ते हसून म्हणायचे, “महानगरपालिकेचे काम रस्ते व परिसर साफ व स्वच्छ ठेवण्याचे आहे. जर माझ्या परिसरातील रस्त्यांवर कचरा व घाण पडली असेल म्हणजेच ते झाडून स्वच्छ केले नसतील तर ती घाण माझ्याच पायाला लागेल’. त्यांच्या या अनवाणी फेरफटक्यामुळे त्यांचा सारा परिसर सदैव स्वच्छ व कचरारहित राहिला हे वेगळे सांगायला नकोच!
पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी साकारलेले अनेक प्रकल्प हे कायमस्वरूपी पुण्याचे वैभव ठरले असेच मानावे लागेल. कचऱ्याचे ढीग हलवून उभारलेले कै. वसंतराव बागुल उद्यान, नाला गार्डन, म्युझिकल फाउंटन, भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी कलादालन, सेव्हन वंडर्स, फोर-डी थिएटर, स्केटिंग हॉल, साहित्यसम्राट विजय तेंडुलकर नाट्यगृह, फुलपाखरू उद्यान, वाळवेकर लॉन्स, विलासराव देशमुख तारांगण हे आणि असे असंख्य प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी साकारले आणि हा सारा परिसर अक्षरश: नंदनवन केले, पर्यटन केंद्र बनवले.
गेल्या काही वर्षांमध्ये तळजाई टेकडीचा विकास व त्यावर उभारलेले क्रिकेटमहर्षी सदू शिंदे क्रीडांगण यामुळे हजारो तरुणांची खेळण्याची गरज भागली, तर सार्या सहकारनगर, पद्मावती, पर्वती, अरण्येश्वर, शिवदर्शन भागाला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळू शकणारा व निसर्गाने नटलेला नियोजित “वसुंधरा प्रकल्प’ हादेखील त्यांच्या कारकिर्दीतील मानाचा तुरा ठरेल.
देशात ज्या प्रकल्पाने लक्ष वेधून घेतले अशा राजीव गांधी ई-लर्निंग स्कूल प्रकल्पाची संकल्पना सुमारे बारा वर्षांपूर्वी आबा बागुल यांनी मांडली आणि पुणे महानरगापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्णही करून घेतला.
यंदा त्याची दशकपूर्ती झाली. आपल्या देशाचे थोर सुपुत्र व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात संगणक व दूरसंचार क्रांती आणली. त्यांचे स्मरण जतन करण्यासाठी देशभर मॉडेल बनलेल्या या शाळेला राजीव गांधींचे नाव देण्याचा ठराव आबा बागुलांनीच दिला. आज या शाळेत प्राथमिकपासून दहावीपर्यंत व पुढे “स्पेस’च्या साह्याने अकरावी व बारावीचे वर्ग यशस्वीपणे चालू असून, गरीब झोपडपट्टीतील पालकांची मुले येथे सीबीएसई अभ्यासक्रम इंग्रजीतून दप्तराविना शिकत आहेत.
सांस्कृतिक क्षेत्रात गेली 27 वर्षे चालू असलेला पुणे नवरात्र महोत्सव हा पुणे शहराच्या सांस्कृतिक कॅलेंडरवरील महत्त्वाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. सलग दहा दिवस चालणारा हा सांस्कृतिक महोत्सव त्यांनी 1994 मध्ये शिवदर्शन भागात उभारलेल्या भव्य दाक्षिणात्य पद्धतीच्या मंदिरातील श्री लक्ष्मीमाता चरणी अर्पित केला आहे. याचे उद्घाटन भारतरत्न स्वरभास्कर पं. भीमसेन जोशींनी केले.
भारतरत्न स्वरसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर यांनी तेथे पसायदान गायले आहे. शेकडो कलाकारांचे कार्यक्रम नवरात्राच्या दहा दिवस प्रथम शिवदर्शन येथे व नंतर श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे सर्वांसाठी विनामूल्य असतात. श्री लक्ष्मीमाता कलागौरव पुरस्कार आणि महर्षी पुरस्कार यामध्ये दिले जातात. प्रथमपासून सकाळी दहा ते रात्री बारा असा सलग बारा तासांचा लावणी महोत्सव हेदेखील या सांस्कृतिक महोत्सवाचे वैशिष्ट्य् आहे.
याशिवाय दरवर्षी दहा हजारांहून अधिक गरीब मुलांसाठी कै. वसंतराव बागुल उद्यानात साजरा होणारा “ख्रिसमस संडे’ हा कार्यक्रम हे आबा बागुलांचे सर्वधर्मसमभावाचेच प्रतीक बनले आहे.
आबा यांच्या कार्याला त्यांची पत्नी सौ. जयश्री बागुल त्यांना सावलीसारखी साथ देत असते. त्यांची मुले राहुल, अमित, कपिल व हेमंत तसेच त्यांचे भाचे, पुतणे सागर, अभिजित, तेजस, महेश हे सारे त्यांच्या पत्नी व कुटुंबांसह या साऱ्या सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यात मन लावून झोकून देऊन काम करीत असतात.
आज लाखोंच्या हृदयात स्वत:चे स्थान प्रेमाने निर्माण करणारे आबा बागुल “कार्यक्षम नगरसेवक’ म्हणूनही गौरविले गेले आहेत. सदैव कार्यकर्त्यांमध्ये, मित्रांमध्ये आणि नागरिकांमध्ये रमणारे आबा बागुल म्हणजे “व्यक्ती एक : पैलू अनेक’ असेच मानावे लागेल. त्यांच्या 13 सप्टेंबर या जन्मदिनानिमित्त त्यांना अंत:करणपूर्वक शुभेच्छा!




