पुणे | तेरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार, सावत्र बापास २२ वर्षे सक्तमजुरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बापास बावीस वर्षांची सक्तमजुरी व सहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास एक वर्षांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे. विशेष न्यायाधीश एस. बी. राठोड यांनी हा निकाल दिला.
ही घटना मे २०२० मध्ये थेरगाव परिसरात घडली. घटनेच्या वेळी पीडित सातवीत शिकत होती. तिची आई घरी नसताना सावत्र वडिलांनी पीडितेवर वारंवार अत्याचार केले, तसेच तिला पट्ट्याने मारहाण करत या प्रकाराची वाच्यता केल्यास आईसह तिला जीवे मारण्याची धमकी दिली. एक दिवस पीडिता भयभीत असल्याचे निदर्शनास आल्यावर तिच्या आईने चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
त्यानंतर पीडितेच्या आईने आरोपीला जाब विचारला असता, त्याने तिलाही शिविगाळ व मारहाण केली. त्यामुळे पीडितेच्या आईने वाकड पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी सरकार पक्षातर्फे बाजू मांडली.
त्यांनी सहा साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडित मुलगी, तिची आई, डॉक्टर व तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सहायक पोलीस उपनिरीक्षक सपना देवतळे यांनी गुन्ह्याचा तपास केला. पोलीस कर्मचारी डी. एस. पांडुळे यांनी न्यायालयीन कामकाजात मदत केली.





