Kunal Kamra : कुणाल कामराला पोलिसांची तिसरी नोटीस; आता कायदेशीर कारवाई होणार?

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टिप्पणीप्रकरणी कुणाल कामरा यांना मुंबईच्या खार पोलिस ठाण्याने पुन्हा समन्स बजावले असून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. कुणाल कामरा यांना जारी करण्यात आलेला हा तिसरा समन्स आहे. यामध्ये कुणाल कामरा यांना ५ एप्रिलपूर्वी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मुंबईच्या खार पोलिस स्टेशनने यापूर्वी कुणाल कामरा यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते, परंतु कुणाल कामरा दोन्ही समन्ससाठी हजर राहिला नाही.
खार परिसरातील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये शिंदे यांच्या सादरीकरणादरम्यान कामराने एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंविरुद्ध शिंदे यांनी केलेल्या बंडाचे वर्णन करण्यासाठी कामराने ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका हिंदी गाण्याच्या संपादित आवृत्तीचा वापर केला.
कुणाल कामरा त्याच्या बेधडक आणि व्यंगात्मक शैलीसाठी ओळखला जातो. यापूर्वीही त्याची अनेक वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या प्रकरणातही कामरावर भावना दुखावल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, जर त्याने या नोटिसला प्रतिसाद दिला नाही, तर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
कुणाल कामराविरुद्ध अनेक एफआयआर
कामराच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून त्याच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या महिन्यात संबंधित स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर विरोधी नेत्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. तपासाचा एक भाग म्हणून, पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या मानहानी आणि सार्वजनिक गैरप्रकारांशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.





