ओझर : शिरोली बुद्रुक (ता. जुन्नर) येथील लक्ष्मण शंकर बोऱ्हाडे आणि त्यांच्या पत्नी विमल लक्ष्मण बोऱ्हाडे या जेष्ठ नागरिकांचे दोन अज्ञात चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे दागीने लंपास केल्याची घटना घडली आहे. यामध्ये तिन तोळ्याचे मंगळसूत्र, एक तोळ्याची माळ तसेच दिड तोळ्याची चैन या दागीन्यांचा सामावेश आहे. काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकी वरून आलेले दोन अज्ञात चोरटे गुरुवारी (ता.२०) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास या जेष्ठ नागरिकांच्या घरी आले. देव्हाऱ्यातील देव उजळून देतो असे सांगून चांदिचा देव उजळून दिला. त्यानंतर त्यांनी आम्ही दागीने पॉलीश करून देतो असे सांगून त्यांच्याकडून दागिने मागितले. या दांम्पत्याने आपले दागिने अज्ञात चोरट्यांकडे दिले. त्यानंतर एक झाकणाचा स्टीलचा डबा आणायला सांगितला. डब्यात पाणी घेऊन त्यात हळद टाकून दागीने टाकल्याचे चोरट्यांनी भासवले आणि सदर डबा गॅसवर उकळण्यास ठेवायला सांगितला. त्यानंतर त्यांनी दाम्पत्यास एक पावडरची पिशवी देऊन त्यात पॉलीश पावडर असल्याचे सांगितले आणि चोरट्यांनी तेथून पोबारा केला. काही वेळानंतर लक्ष्मण बोऱ्हाडे यांनी डबा उचकून पाहिले असता दागीने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांचा मुलगा मल्हारी बोऱ्हाडे याने घराजवळील आणि परिसरातील सीटीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात दोन चोरटे दुचाकीवरून साखर कारखान्याच्या दिशेने गेल्याचे आढळून आले.या घटनेबाबत जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.