Shivajirao Adhalrao Patil: आंबेगाव, जुन्नर, हवेलीचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा! शिवाजीराव आढळराव पाटील यांची मागणी
Shivajirao Adhalrao Patil: शिरूर मतदारसंघातील आंबेगाव, जुन्नर आणि हवेली तालुक्यात पावसाचा मोठा खंड; खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.

Shivajirao Adhalrao Patil- शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव, जुन्नर आणि हवेली तालुक्यांमध्ये पावसातील खंड, अनियमित पर्जन्यमान आणि खरीप पिकांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी पुणे म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
तालुकास्तरीय सरासरीऐवजी गावनिहाय आणि महसूल मंडळनिहाय परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेण्याची मागणीही त्यांनी केली. आढळराव पाटील यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने खरीप हंगाम 2026 मध्ये ट्रिगर-1 अंतर्गत राज्यातील 265 तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुके म्हणून समावेश केल्याचा संदर्भ देत,
त्यामध्ये आंबेगाव, जुन्नर आणि हवेलीचा समावेश नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. या पार्श्वभूमीवर संबंधित तालुक्यांची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा फेरआढावा घेण्याची मागणी त्यांनी केली. आंबेगावच्या पूर्व व उत्तर भागातील गावांमध्ये पावसातील खंड आणि अनिश्चिततेचा खरीप पिकांवर परिणाम झाला आहे. लोणी, धामणी, शिरदाळे, मांदळेवाडी, वडगावपीर, पाहाडदरा यांसह सातगाव पठारातील कुरवंडी,
कोल्हारवाडी, थूगाव, भावडी, कारेगाव, पेठ आणि पारगाव तर्फे खेड या गावांचा स्वतंत्र आढावा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या भागात बटाटा, सोयाबीन, वाटाणा व भाजीपाला ही पिके घेतली जातात. पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा-पाणी, जलस्रोत आणि पीकस्थितीचा गावनिहाय आढावा घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आहे.
जुन्नर तालुक्यात पश्चिम भागात समाधानकारक पाऊस झाला असला तरी पूर्वेकडील पठारी भागातील परिस्थिती वेगळी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. आणे, नळावणे, शिंदेवाडी, पेमदरा, बांगरवाडी, रानमळा, बेल्हे, गुळंचवाडी, राजुरी यांसह पूर्व भागातील गावांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिकांना फटका बसला आहे.
विशेषतः सोयाबीन पिकांच्या स्थितीचा तसेच आगामी पाणीटंचाईचा स्वतंत्र आढावा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.हवेली तालुक्यातील ग्रामीण भागातही पावसाच्या अनियमिततेचा शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असून, पर्जन्यमान, पीकस्थिती, विहिरी, बंधारे, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यांचे गावनिहाय मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
“आंबेगाव, जुन्नर आणि हवेली तालुक्यांतील बाधित गावांची प्रत्यक्ष पाहणी करून पर्जन्यमान, पावसातील खंड, पीकनुकसान, जलसाठे, भूजलस्थिती, पिण्याचे पाणी आणि पशुधनासाठी उपलब्ध पाण्याचा वस्तुनिष्ठ आढावा घ्यावा. पात्र बाधित शेतकर्यांचे पीकनुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्यांना दुष्काळी सवलती व शासकीय मदत मिळण्यासाठी कार्यवाही करावी.”
– शिवाजीराव आझळराव पाटील, माजी खासदार






