त्यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल; शेलारांनी फेटाळले नवाब मलिकांचे आरोप

मुंबई – हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे सकाळी 10 वाजता लवंगीही लावू शकले नाहीत. लवंगी लावण्याचा प्रयत्न केला, त्यात हात पोळले आणि म्हणून त्यांची हतबलता, घालमेल इतकी होती की, त्यांना हायड्रोजन सोडून ऑक्सिजनची गरज लागेल, असे वाटले, असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार म्हणाले, मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे अशी अनेक नावं घेऊन त्यांनी खूप मोठे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला, पण तो विफळ ठरला. याचा कारण देवेंद्र फडणवीसांशी जोडणं याचा प्रयत्न नवाब मलिकांनी केला, पण त्यात सत्य नाही, असे म्हणत नवाब मलिकांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा आशिष शेलारांनी केला.
ज्या पद्धतीने आरोप केला त्यातले सत्य हे आहे की, त्या प्रकरणात पकडला गेलेला इमरान आलम शेख हा हाजी अराफतचा भाऊ होता. तो कॉंग्रेसचा तत्कालीन सचिव होता. जेव्हा त्याच्यावर आरोप झाले, त्याला अटक झाली त्यावेळी तो कॉंग्रेसचा सचिव होता.
आता ज्यावेळी मलिक आरोप करत आहेत, त्यावेळी तो राष्ट्रवादी कॉंग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे सामान्य माणसांना फसवण्याचा, लटकवण्याचा जो राष्ट्रवादी कॉंग्रेसचा धंदा आहे, त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आरोप करण्याचा प्रयत्न मलिकांनी केला, असा टोलाही त्यांनी लगाविला.





