‘मला अटक करण्याचा प्रयत्न एकदा नाही, तर चार वेळा झाला’ – देवेंद्र फडणवीस

नागपूर – परमबीर सिंह यांनी मला आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्यासंदर्भात जो दावा केला आहे. तो खरा आहे. असा प्रयत्न त्यावेळी झाला होता. त्यांनी फक्त एकच घटना सांगितली आहे. मात्र, मला अटक करण्याचा प्रयत्न एकदा नाही, तर चार वेळा झाला.
खोट्या केस करून मला कशी अटक करता येईल, याचे षडयंत्र झाले, पण त्यावेळी आम्ही त्याचा खुलासा करू शकतो. त्याचे पुरावे आम्ही सीबीआयला दिले, त्याचे पुरावे आजही आमच्याकडे आहेत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आले. यावर परमबीर सिंह यांनी लावलेले आरोप सत्य असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये माझ्यासह भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याची सुपारी काही पोलीस अधिकाऱ्यांना दिली होती.
त्यांनी ती सुपारी घेतली देखील होती. पण त्यांना यश मिळाले नाही. कारण काही चांगल्या अधिकाऱ्यांनी असे खोटे गुन्हे दाखल करण्यास नकार दिला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.





