महागाईची संक्रांत आपल्यावरच उलटू शकते, याचे भान ‘त्यांनी’ ठेवावे

महागाईवरुन शिवसेनेचा सामनामधून भाजपला टोला
मुंबई : देशातील वाढलेली महागाई आणि घसरलेल्या आर्थिक विकासाच्या दरावरून विरोधक नेहमीच केंद्र सरकारवर टीका करताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून तर यात आणखी भर पडली आहे. दरम्यान, ही संधी शिवसेनेने देखील सोडली नाही महागाईवरून भाजपावर सेनेकडून टीकास्त्र उगारण्यात आले.
तुमचा तो नागरिकता सुधारणा कायदा, एनआरसी वगैरे गोष्टी, त्यावरून उठलेले वादंग सुरूच राहील, पण सामान्य माणसाला सोसाव्या लागणा महागाईच्या झळांचे काय? सीएए, एनआरसीमुळे सामान्य माणसाच्या पदरात ना नोकरी पडणार आहे ना पगार, ना भाजीपाला-अन्नधान्य स्वस्त होणार आहे ना इतर जीवनोपयोगी वस्तू. जनतेवर आलेली महागाईची संक्रांत आपल्यावरच उलटू शकते, याचे भान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी ठेवलेले बरे!, असा इशारा देणारा बाण शिवसेनेने भाजपा सोडला आहे.
वाढत्या महागाईला आणि देशाच्या घसरत चाललेल्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची धोरण कारणीभूत असल्याचा आरोप करत शिवसेनेने मोदी सरकारवर सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. सध्या देशात रोजच कुठला ना कुठला भडका होत आहे. महागाईचा भडका तर आधीपासूनच उडाला आहे. मात्र आता त्याच्या ज्वाळा जास्तच भडकल्या आहेत. किरकोळ चलनवाढीने मागील पाच वर्षांतील उच्चांक गाठला आहे. किरकोळ महागाईचा दर साधारणपणे चार टक्क्यांच्या आसपास राहील अशी रिझर्व्ह बॅंकेचीही अपेक्षा होती, पण प्रत्यक्षात हा दर 7.35 टक्क्यांवर गेला आहे. म्हणजे अंदाजाच्या जवळजवळ दुप्पट महागाई झाली आहे. एकीकडे आर्थिक विकासाचा दर तळाला तर दुसरीकडे महागाईचा निर्देशांक गगनाला अशा कचाटयात सध्या देश सापडला आहे.
जागतिक मंदी, अमेरिका-इराण यांच्यातील संघर्ष, अमेरिका-चीन व्यापार युद्ध वगैरे तत्कालिक कारणे या परिस्थितीसाठी कारणीभूत आहेत हे मान्य केले तरी विद्यमान केंद्र सरकारच्या धोरणांचे काय? किंबहुना देशाची अर्थव्यवस्था उतरणीला लागण्यास आणि महागाईने उच्चांक गाठण्यास हीच धोरणे जास्त जबाबदार म्हणता येतील. देशातील सामान्य जनता या झळांनी होरपळते आहे. इतर कामांचे ढोल पिटण्यापेक्षा सरकारने या झळा कमी कशा होतील याकडे लक्ष द्यायला हवे. ते नाही दिले तर जनतेवर आलेली महागाईची संक्रांत आपल्यावरच उलटू शकते, याचे भान केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी ठेवलेले बरे!, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.





