“हिंदू – मुस्लिमांमध्ये फूट पाडली, वंदे मातरमला द्वेषाची भाषा केली”; काँगेसच्या बड्या नेत्याचा भाजपावर हल्लाबोल !

Congress | BJP – भाजपाने हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडून मेवातमध्ये समुदायांचे ध्रुवीकरण केले. तसेच त्यांनी मातृभूमीबद्दल आदर दर्शवणाऱ्या ‘वंदे मातरम’ या घोषणेला द्वेषाच्या भाषेत बदलले आहे, असे वक्तव्य काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केले आहे. राज्यसभा सदस्य असलेल्या सुरजेवाला एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
सुरजेवाला म्हणाले की, भाजपने हरियाणात समुदायांना वारंवार एकमेकांविरुद्ध उभे करून विभाजनवादी राजकीय मॉडेल अवलंबले आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात अनेक पातळ्यांवर फूट पडली आहे – जाट विरुद्ध गैर-जाट, पंजाबी विरुद्ध अग्रवाल, गरिबांमध्ये रविदासिया विरुद्ध वाल्मिकी, शीख विरुद्ध हिंदू आणि ब्राह्मण व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांमध्ये फूट पाडली गेली असून या सगळ्याला भाजपा जबाबदार आहे.
सुरजेवाला पुढे म्हणाले की, द्वेषाचा प्रसार इतका वाढला आहे की, भगवान कृष्णाच्या शिकवणीशी संबंधित पवित्र भूमी मानल्या जाणाऱ्या कैथल-कपिस्थलमध्येही लोक आपल्याच लोकांना शिवीगाळ करत आहेत आणि त्यांना बाहेरचे ठरवत आहेत.
हरियाणाच्या लोकांना शेतीद्वारे देशाला अन्न पुरवण्यासाठी ओळखले जाते. पण आता राज्यात द्वेषाचे पीक घेण्यासाठी कोण जबाबदार आहे? लोकांनी मतभेदांच्या पलीकडे जाऊन भगवद्गीतेत शिकवलेल्या प्रेम, कर्तव्य आणि धर्माच्या संदेशाचे पालन करावे.





