वाघोलीत विकास कामांच्या उद्घाटनांची होणार हॅट्रिक

वाघोली | वाघोली तालुका हवेली येथील पुणे महानगरपालिकेच्या वतीने 17 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन होणार असून विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी हे उद्घाटन करण्यासाठी सोशल मीडियावर जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. वाघोलीत बॅनरबाजी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.
पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांच्या उद्घाटनांची एकाच दिवसात 24 तासांच्या आत हॅट्रिक होणार असल्याचे चित्र वाघोलीत निर्माण झाले आहे.
विधानसभेसाठी इच्छुक असणारे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते दि. ११ रोजी ११ च्या सुमारास रात्री वाघोली मध्ये जवळपास 17 कोटी रुपयांचे विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब सातव पाटील, माजी सरपंच शिवदास उबाळे,उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते युवराज दळवी, संजय सातव पाटील, राजेंद्र पायगुडे, सोसायटीमधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
दि. 12 रोजी सकाळी नऊच्या सुमारास पुणे महानगरपालिकेचे याच विकास कामांचे उद्घाटन विधानसभेसाठी इच्छुक असणारे उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष माऊली कटके यांच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. याप्रसंगी माजी उपसरपंच मंदाकिनी जाधवराव, माजी सरपंच वसंतकाका जाधवराव, माजी उपसरपंच समीर भाडळे, अनिल सातव पाटील, मारुती गाडे, सुनील जाधवराव,संग्राम जाधवराव, विकास शिंदे, सचिन काळे, प्रशांत काळे, पिंटू कटके, मुकेश सातव व अन्य मान्यवर उपस्थित होते.
तर सायंकाळी म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुनील टिंगरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदिप भोंडवे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, शासन नियुक्त विकास समिती सदस्य संदीप सातव, शांताराम कटके,श्याम गावडे, रवी काळे, बाळासाहेब सातव, , अर्चना कटके, सोमनाथ आव्हाळे, महेंद्र भाडळे, जयप्रकाश सातव,कैलास सातव विजय जाचक, प्रदीप सातव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
विकास कामांच्या उद्घाटनांची हॅट्रिक पहिल्यांदा वाघोलीकरांना पाहायला मिळणार आहे. वाघोलीत उद्घाटनांमुळे सध्या श्रेयवादाची लढाई अंतिम शिगेला पोहचली असल्याचे दिसून येत आहे. विकास कामांसाठी पाठपुरावा केलेली पत्र, दिलेल्या भेटी, अधिकाऱ्यांसमवेत काढलेले फोटो, पाठपुराव्यानंतर विकास कामांचे आलेले टेंडर चे फोटो, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाघोलीतील ग्रामस्थांना या विकास कामांसाठी हजेरी लावताना मात्र दमछाक होताना दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत खरी रंग त आली असल्याचे या तिन्ही उद्घाटनांच्यामुळे स्पष्ट होणार असले तरी एकाच दिवसात एकाच विकास कामांच्या तीन उद्घाटने पाहण्याचा दुर्मिळयोग वाघोलीकरांना आला आहे हे मात्र सत्य आहे.
सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर…
भाजपचे संदीप सातव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शांताराम कटके यांनी मंत्रिमंडळाचे फोटो टाकून दि. १२ रोजी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित 17 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर माजी उपसरपंच समीर भाडळे, अनिल सातव पाटील यांनी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या माऊली कटके यांचा फोटो टाकून उद्घाटन दि. 12 रोजी सकाळी नऊच्या सुमारास होणार जाहीर केले. त्यानंतर आमदार अशोक पवार यांच्या निकटवर्तीय यांनी दि. 11 रोजी रात्री नऊच्या पुढे विकास कामांचे उद्घाटन होणार असल्याचे जाहीर करून उद्घाटनच केले. यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.





