“तिरंगा नाही, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा, लाल किल्ल्यावर…”; संभाजी भिडेंचे विधान

Sambhaji Bhide | शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. देशाच्या शीर्षस्थानी भगवा झेंडा आला पाहिजे, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते कोल्हापुरातील एका आंदोलनादरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी थेट राष्ट्रध्वजावर भाष्य केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरातील एका आंदोलनादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगत मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला होता याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे. या देशात जो महायज्ञ सुरू आहे, तो विझू देता कामा नये. या महायज्ञाची सांगता, या देशाच्या शीर्षस्थानी भगवा झेंडा आला पाहिजे अशी करायची आहे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.
“शिवछत्रपती गेल्यानंतर प्रचंड नैराश्य आले, आता पुढे काय? असे प्रश्न समोर आले. संभाजी महाराज छत्रपती झाले, केवळ पावणे 9 वर्षे छत्रपती म्हणून काम संभाजीराजेंनी केले, आपल्या वडिलांना शोभेल असे काम त्यांनी केले. वडिलांच्या तोडीस तोड कर्तृत्व गाजवले, नंतर अतिक्रूर मरण त्यांच्या वाट्याला आले. संभाजी महाराजांची जी हत्या झाली, त्या भडव्या औरंग्याने नीचपणा केला.”
‘पाकिस्तानचा नायनाट करु’
महाराजांच्या सर्व आठवणीतून धारकरी मराठा मंडळी उठली आणि महाराष्ट्रातील धारकऱ्यांनी कन्याकुमारी ते काश्मीर उभे-आडवे 3200 किलोमीटर लांब 3200 किलोमीटर आडवे राज्य केलं. दिल्लीचं मुघलांच तक्त तोडलं, तुकडे केले आणि मराठ्यांनी लाल किल्ल्यावरती 1784 ते 1803 भगवा फडकवून 19 वर्ष हिंदवी स्वराज्याचे राज्य केलं. याची पुनरावृत्ती म्हणजेच हिंदुस्तानचा झेंडा तिरंगा नाही, हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज भगवा आहे. तो परत लाल किल्ल्यावर फडकवत्यानेच आजच्या उपोषणाची समाप्ती होणार आहे. काशीचा विश्वेश्वर पुन्हा निर्माण करुन पाकिस्तानचा नायनाट करु, हे स्वातंत्र्य भगव्या झेंड्याचे उत्पन्न करणारे उपोषण आहे, असे संभाजी भिडे यांनी म्हटले.
हेही वाचा:
प्रशांत किशोर यांना रॅलीदरम्यान दुखापत; भाषण न देताच रुग्णालयात केले दाखल





