नवी दिल्ली – दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात 10 हजार हिंदुंनी बौध्द धर्म स्विकारला असल्याचे बोलले जाते. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीतील कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाल गौतम या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी हिंदू देवतांची पुजा करणार नसल्याची शपथ या नागरिकांनी घेतल्यामुळे गौतम, अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आम आदमी पक्ष भाजपच्या निशाण्यावर आहे. भाजपने यांना हिंदू विरोधी म्हटले आहे. मात्र राष्ट्रीय सवयंसेवक संघाच्या परिवारातील विश्व हिंदू परिषदेने वेगळीच भूमिका मांडली आहे. कोणी बौध्द धर्म अंगिकारला तर त्यात काही अडचण नाही असे विंहंपने म्हटले आहे. एका इंग्रजी माध्यमाला दिलेल्या विशेष मुलाखतीत परिषदेचे आंतरराष्ट्रीय सह सरचिटणीस सुरेंद्र जैन म्हणाले की, भारताची घटनाही बौध्दांना हिंदूच मानते. एकाच कुटुंबात प्रार्थना आणि पूजा करण्याच्या वेगवेगळ्या पध्दती असू शकतात. त्यामुळे कोणी बौध्द धर्माचा स्विकार केला तर त्याला परिषद धर्मांतर मानत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांनाही याच दुविधेचा सामना करावा लागला होता. अस्पृश्यतेतून मुक्ती मिळावी म्हणून त्यांनी अन्य धर्मांचाही अभ्यास करून बौध्द धर्म स्विकारला. हिंदुत्वाबाबत त्यांची अडचण नव्हती तर अडचण होती ती अस्पृश्यतेबाबत. त्यामुळे कोणी हिंदूने जर हा धर्म स्विकारला तर त्याला अडचण असण्याचे काहीच कारण नाही. राजेंद्र पाल गौतम यांच्यावर टीका गौतम यांच्यावर टीका करताना जैन म्हणाले की त्यांनी हा फार्स करण्याऐवजी आपल्या मतदार संघातील दलित बांधवांच्या स्थितीकडे लक्ष द्यावे. त्यांचा सीमापुरी मतदारसंघ सर तन से जुडा गॅंगसाठी नंदनवन झाले आहे. ते जिहादींची बाजू घेत आहेत. या जिहादींनी दलित हिंदूंचे जगणे अशक्य करून टाकले आहे. त्यांच्या मतदारसंघातील दलित महिलांना सातत्याने विनयभंगाच्या प्रकारांना सामोरे जावे लागते आहे आणि त्यांच्यासाठी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.