पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विश्व हिंदू परिषदेच्या मठ मंदिर आयाम महाराष्ट्र- गोवा यांच्या वतीने दिवाळीपूर्वी मंदिर स्वच्छता, मंदिरावर रोषणाई आणि भगव्या ध्वजाचे विविध समाजाच्या तरुण जोडप्यांतर्फे पूजन असा त्रिसूत्री कार्यक्रम घेण्यात आला आहे. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राज्यातील ५ हजार मंदिरांत गाभारा ते अंगण असे स्वच्छता सेवा अभियान राबविण्यात येणार आहे. रविवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेत हे अभियान संपूर्ण राज्यात होणार आहे, अशी माहिती परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा धार्मिक विभाग प्रमुख संजय मुद्राळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, मंदिर अर्चक आयाम प्रमुख धनाजी शिंदे, सूर्यकांत थोरात उपस्थित होते. गाभारा ते अंगण या अभियानात सामील होणे ही बिनखर्चिक बाब असून. सेवाभाव जपणारा हा उपक्रम आहे. मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी ते सुंदर, स्वच्छ असले पाहिजे, ही विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे. मंदिर समाजातील सर्व घटकांचे आहे. सर्वांना त्यात स्थान असून, सन्मान आणि वाव देखील आहे. हा समरसतेचा संदेश सर्व दूर जाण्यासाठी आणि नवीन पिढीला मंदिरांशी जोडण्यासाठी भगव्या ध्वजाचे पूजन तरुण जोडप्यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. दिवाळी हा हिंदू धर्मामध्ये मोठा सण आहे. त्यानिमित्त आपल्या घरावर रोषणाई केली जाते, तशीच मंदिरांची स्वच्छता करून रोषणाई करण्याचे आवाहन राज्यातील सर्व मंदिरांना करण्यात आले आहे. आपल्या जवळच्या मंदिरात नागरिकांनी जाऊन स्वच्छता सेवा द्यावी. अभियान मोठ्या प्रमाणात राबवले जावे, यासाठी महाराष्ट्र राज्याच्या चारही प्रांतांत काम सुरू आहे, असे शिंदे म्हणाले. अनेक मंदिरांत स्वच्छता समूह महिला विश्वस्त, पुरोहित आणि भाविक या उपक्रमात पुढाकार घेत आहेत. विविध सांप्रदायांचे, संतांचे अनुयायी, पुरोहित महासंघ या अभियानात सामील झाले आहेत. मागील वर्षी ५५० मंदिरांत हे अभियान राबविण्यात आले होते. त्यातून अनेक मंदिरात मंदिर स्वच्छता समूह तयार झाले आणि काही ठिकाणी दररोज, आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा स्वच्छता सेवा ते देतात, असेही या वेळी सांगण्यात आले.