पुणे | आजच्या परिस्थितीत समाजाने एकत्र आणणे महत्त्वाचे

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – हिंदू धर्म हा सर्व समभाव मानणारा आहे, कोणालाही कमी लेखणारा, भेदभाव करणारा नाही. आजच्या परिस्थितीत समाजाला एकत्र आणणे महत्वाचे आहे, आपण सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे हे मान्य आहे, असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी केले.
विश्व हिंदू परिषद पुणे महानगराच्या वतीने स. प . महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉल मध्ये आयोजित “संत संगम’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून गोविंददेव गिरी महाराज बोलत होते. यावेळी भंते हर्षवर्धन शाक्य, ज्ञानी अमरजीत सिंह, ह.भ.प.चिदंबरेश्वर साखरे महाराज, १००८ किन्नर आखाडा महामंडलेश्वर दीपाजी नंदगिरी जगावली माताजी,
श्री महानुभव पंथाचे रविराजदादा पंजाबी, सिंधी संप्रदायाचे संत अनंत प्रकाशजी, वाल्मिकी संप्रदायाचे कैलासनाथ व भगवान महाराज, ह.भ.प फुरसुंगीकर व ह.भ.प पळसे महाराज यांसह विहिंप महाराष्ट्र व गोवा धार्मिक विभाग संजय मुद्राळे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, नागनाथ बोंगरगे, समीर पायगुडे, धनंजय गायकवाड, केतन घोडके आदी उपस्थित होते.
गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, आपला समाज-देश टिकला पाहिजे. आपण जगाला प्रेम देण्यासाठी आधी आपल्या सुरक्षेची तरतूद करणे आवश्यक आहे. देशात समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे.
शिवरायांचा विचार देशात रुजणे महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वरांचे पसायदान हाच आपल्या संस्कृतीचा जाहीरनामा आहे. प्रास्ताविक किशोर चव्हाण यांनी केले.
संजय मुद्राळे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद अशा अनेक संतांचे अनमोल योगदान आहे. आपल्यावर असंख्य परकीय आक्रमणे झाली, मात्र आपण आपला धर्म फक्त संताच्या धैर्यामुळे, मार्गदर्शनामुळे टिकू शकलो आहोत. आजही त्यांच्या विचारांची आपल्या देशाला गरज आहे. सूत्रसंचालन शुभम मुळूक यांनी केले.





