राज्यात आत्तापर्यंत 12 मराठा मुख्यमंत्री, मग फडणवीसांनाचं टार्गेट का? संभाजीनगर येथील बॅनरची जोरदार चर्चा

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण केले असताना, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका बॅनरने नव्या चर्चेला जन्म दिला आहे. वैजापूर शहरात झळकलेल्या या बॅनरवर महाराष्ट्राच्या १२ मराठा मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून, “महाराष्ट्रात १२ मराठा मुख्यमंत्री झाले, मग टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का?” असा थेट सवाल विचारण्यात आला आहे. मराठवाड्यातील मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर, हा बॅनर अज्ञात व्यक्तीने लावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जारांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत मुंबईत आंदोलन केले. त्यांनी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी मागणी लावून धरली आहे. याचवेळी, हैदराबाद गॅझेट लागू केल्याने ओबीसी नेते आक्रमक झाले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या निष्क्रियतेची टीकाही झाली.
या बॅनरवर फडणवीसांनी २०१८ मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा उल्लेख आहे, परंतु २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारमुळे ते सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याचा आरोपही आहे. यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंतच्या १२ मराठा मुख्यमंत्र्यांचे फोटो बॅनरवर असल्याने, हा राजकीय डाव असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी बॅनर लावणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
मराठवाडा, विशेषतः जालना, संभाजीनगर आणि बीड, हे मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्र आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ७ खासदार याच भागात पराभूत झाले, ज्यामुळे हा वाद अधिक तीव्र झाला. बॅनरमुळे फडणवीसांना लक्ष्य करण्यामागे राजकीय डावपेच असल्याचा आरोप होत आहे.
नेमकं बॅनरवर काय लिहिलंय?
महाराष्ट्रात 1960 पासून गेल्या 64 वर्षांच्या काळात आत्तापर्यंत एकूण 12 मराठा मुख्यमंत्री झाले आहेत. मग टार्गेट म्हणून देवेंद्र फडणवीसचं का? असा सवाल या होर्डिंगवरुन विचारण्यात आला आहे.
तसेच, देवेंद्र फडणवीसांनी 2018 साली मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण दिले होते. मात्र, 2021 साली उद्धव ठाकरेंच्या महाविकास आघाडी सरकारने ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात घालविले, असेही बॅनरवर लिहिण्यात आले आहे.





