Sharad Pawar : “नेहरू आणि पंतप्रधान मोदी यांच्यात तुलना होऊ शकत नाही” – शरद पवार
पंतप्रधान मोदी हे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनले आहेत आणि त्यांच्या तोडीचा दुसरा नेता नाही, असे चित्र निर्माण केले जात आहे.

Sharad Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी बुधवारी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची प्रशंसा केली. राष्ट्र उभारणीतील त्यांचे योगदान आणि त्यांनी दिलेले बलिदान विसरता येणार नाही.
तसेच, नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तुलना होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झाला.येथे यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले, पंतप्रधान मोदी हे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान बनले आहेत आणि त्यांच्या तोडीचा दुसरा नेता नाही, असे चित्र निर्माण केले जात आहे. राष्ट्र उभारणी आणि स्वातंत्र्यलढ्यातील नेहरूंचे योगदान विसरता येणार नाही आणि त्याचा आदर केलाच पाहिजे. त्यांची तुलना इतर कोणाशीही होऊ शकत नाही.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्यलढ्यादरम्यान नेहरूंनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला. पंतप्रधान मोदी हे देशाचे सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले पंतप्रधान बनल्याचा उल्लेख करत पवार म्हणाले, ही चांगली गोष्ट आहे. संसदीय लोकशाहीत पंतप्रधान हे घटनात्मक पद आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.
पण नेहरू हे नेहरूच आहेत आणि भारतीय जनता त्यांचे बलिदान विसरू शकत नाही. सत्ताधारी मंडळी शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि महिलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असे ते म्हणाले. देश अनेक समस्यांशी झुंजत आहे, असे सांगत त्यांनी देशाचे परराष्ट्र धोरणही समाधानकारक नसल्याचे नमूद केले.
‘नव्या भारताच्या निर्मितीत मोदीजींचे स्थान अढळ’ – देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुठलीही स्पर्धा नाही. खरे म्हणजे केवळ हा रेकॉर्डचा भाग आहे की, देशामध्ये इलेक्टेड, निर्वाचित पंतप्रधानांमध्ये नेहरूजींचा एक रेकॉर्ड होता. ते 4398 दिवस होते. मोदीजी आता 4399 दिवस झालेत आणि पुढे ते राहणार आहेत.
याच्या व्यतिरिक्त नेहरूजींच्या काळात नेहरूजींनी जे केले ते आपल्याला माहिती आहे. मोदीजींच्या काळात मोदीजींनी जे केले ते आपल्याला माहिती आहे. तुलना करायचा विचारच नाही, विषय नाही. नव्या भारताच्या निर्मितीमध्ये मोदीजींचे जे स्थान आहे, ते आढळ आहे. त्यामुळे मी कोणाशी तुलना करू इच्छित नाही.






