पुणे | शहरात जागोजागी पाण्याची तळी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने अनेक भागांत पाण्याची तळी साचत आहेत. तरीदेखील महापालिका आयुक्तांनी मात्र शहराच्या जुन्या हद्दीतील पावसाळी कामे ९८ टक्के पूर्ण झाल्याचा अजब दावा केल्याने नागरिकांतून उलटसुलट चर्चा होत आहे.
सध्या शहराच्या अनेक भागांत साचत असलेले पाणी पावसाळी वाहिन्यांच्या झाकणावर कचरा साठत असल्याने सिमेंटची झाकणे बदलून जास्तीत जास्त लोखंडी जाळ्या लावण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले, तसेच उर्वरीत कामे पावसाळ्यात पूर्ण केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या वेळी नाले सफाई करण्यासाठी पूरस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणी आधी काम केली असल्याचा दावाही आयुक्तांनी केला.
आयुक्त भोसले म्हणाले, की शहरात एकूण २३४ नाले ६६२ कल्वर्ट आहेत, तर नाल्यांची लांबी ३६२ किलोमीटर आहे. त्यातील ८८ किलोमीटरच्या नाल्यांच्या ठिकाणी धोकादायक पूरस्थिती उद्भवते. त्यामुळे १५ मे पर्यंत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
हे काम जवळपास ९८ टक्के पूर्ण झाले असून, उर्वरीत १८६ किलोमीटर लांबीच्या नाल्यांचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरीत काम पावसाळ्यापूर्वी केले जाईल. याशिवाय शहरात असलेल्या ६६२ कल्वर्ट मधील ११६ कल्वर्ट धोकादायक असून, या सर्व ठिकाणी पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
लोखंडी जाळ्या बसविणार
शहरात ज्या भागात अवकाळी पावसाने पाणी साचले होते, त्या भागात साचलेले पाणी कचरा व मातीमुळे साचले आहे. पावसाळी चेंबरची झाकणे सिमेंटची असल्याने ही स्थिती उद्भवली असल्याचा दावा प्रशासनाच्या माहितीच्या आधारावर आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात सिमेंटची झाकणे बदलून त्या जागी लोखंडी जाळ्या बसविण्यात याव्यात, अशा सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेकडून यापूर्वी बसविण्यात आलेल्या जाळ्या चोरी होत असल्याने महापालिकेने सिमेंटच्या जाळया बसविल्या होत्या. मात्र, शहरातील उद्भवणारी पूरस्थिती लक्षात घेता महापालिका पुन्हा लोखंडी जाळ्या बसविणार आहे.




