पुणे | पक्षात नेतृत्वाबद्दल कोणतेही वाद नाहीत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला एकाच जागेवर विजय मिळाला आहे, याबाबत विचारले असता सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, मी कुठे ही असलो, तरी जे काम दिले आहे, ते मी करतो. श्रेय, यश आणि अपयश याबद्दल मी फार नाही बोलणार नाही, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाबद्दल कोणतेही वाद नाहीत.
सगळे निर्णय एकत्र बसून घेतो. महायुती म्हणून आम्ही लोकसभा जिंकलो, महायुती म्हणून विधानसभा लढवणार आहोत, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
साखर संकुल येथील बैठकीनंतर सहकारमंत्री वळसे- पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की लोकसभेच्या निकालानंतर सगळ्याच पक्षांनी आत्मचिंतन करायला सुरुवात केली आहे. आम्हीही अभ्यास करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक पक्ष रणनीती ठरवेल. राष्ट्र आणि राज्य पातळीवर रणनीती ठरेल.
राज्यात जिल्हा बँकांना खरीप पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १७ हजार ४४३ कोटी दिले असून, त्यापैकी ११ हजार ४८५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप (६८ टक्के) झाले आहे. उर्वरित कर्जवाटप ३० जूनपर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत. नागरी बँकांच्या समस्यांबाबत एक समिती नेली होती.
त्याचा अहवाल बैठकीत सादर करण्यात आला आहे. याबाबत राज्य सरकारकडून निर्णय घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा अद्याप लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या जिल्हानिहाय याद्या संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जिल्हा उपनिबंधक यांच्यामार्फत सहकारी आयुक्त यांना सादर कराव्यात. योजनेचा लाभ काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही, त्यांना तो देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.




