‘…तर आम्ही मशीद पाडू’; सिडकोकडून भूखंड दिल्याप्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक

मुंबई – काही दिवसांपूर्वी अहमदनगर आणि कोल्हापूरमध्ये घडलेल्या घटनांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. यानंतर आता मुंबईतील उलवे भागातील मशिदीसाठी सिडकोकडून भूखंड देण्यास सकल हिंदू समाज संघटनेने विरोध केला आहे. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा हिंदू-मुस्लिम वाद वाढत जात असल्याचे चित्र दिसत आहे.
इतकेच काय तर, ही मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे. तसेच मशीद पाडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. यावेळी सिडको कार्यालयात निदर्शने करत ‘जय श्री राम’च्या घोषणा आंदोलकांकडून देण्यात आल्या. याबाबत सकल हिंदू समाजचे सदस्य राजेंद्र पाटील म्हणाले कि, “उलवेमध्ये बहुसंख्य हिंदू लोक राहतात. तर मुस्लिम नागरिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे आम्ही येथे मशिदीला परवानगी देऊ शकत नाही. हिंदू जागे झाले आहेत आणि म्हणूनच आज आपण सर्वजण मशीदीचा विरोध करण्यासाठी एकत्र आलो आहोत.”
पुढे ते म्हणाले, “आम्ही हे होऊ देणार नाही. आमदार महेश बालदी यांना मुस्लिमांना खूश करायचे असेल तर ते उरणमध्ये मशीद बांधू शकतात. भूखंड वाटपाचे समर्थन करणाऱ्या त्यांच्या कृतीचा आम्ही निषेध करतो आम्ही हा भूखंड देण्याच्या विरोधात न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. मशीद बांधू नये यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ, कायदाही हातात घेऊ शकतो. सिडकोने जर ते वाटप रद्द केले नाही तर आम्ही मशीद पाडू.” उरणचे अपक्ष आमदार बालदी यांनी सिडकोच्या बैठकीत मुस्लिमांसाठी भूखंड सोडण्याची मागणी केली होती. मात्र यावर आता त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही.
या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते नरेंद्र पाटील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “काही समाजकंटक त्या भागात आपला धर्म पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. या हिंदू भागात इतर कोणत्याही समाजाला जमीन देण्यात अर्थ नाही. जिथे तो समाज बहुसंख्य असेल तिथे जमीन दिली जाऊ शकते. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सिडको यांनी या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन आपला आदेश मागे घ्यावा,” असे त्यांनी म्हंटले आहे. सिडकोने मशिदीसाठी सेक्टर 19 मध्ये भाडेतत्त्वावर भूखंड दिला आहे.


