पुणे जिल्हा | …तर शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात

नारायणगाव (वार्ताहर) – जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी बरोबरच शिवसेनेचे राजकीय वर्चस्व असताना केवळ राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमुळे तालुक्यातील शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मग ती शिवसेना उद्धव ठाकरे गट अथवा एकनाथ शिंदे गटाची असली तरीही. तालुक्यातील विद्यमान आमदारांनी भविष्यात काही वेगळा निर्णय घेतला नाही तर अजित पवार गटाकडून तालुक्यातील विधानसभेची अधिकृत उमेदवारी मिळेल यात शंका नाही.
तर शरद पवारांच्या जुन्नर दौर्यामुळे त्यांच्याही राष्ट्रवादी पक्षाला उभारी मिळाली असून त्यांच्याच पक्षातील उमेदवाराला उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त असल्याची चर्चा आहे.
त्यामुळे जुन्नर तालुक्यातील राजकीय परिस्थिती आहे अशीच राहिली तर राष्ट्रवादी शरद पवार व अजित पवार गटाचेच उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवतील अशी स्थिती आहे.
विधानसभेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी आग्रही असले तरी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अधिकृत उमेदवारी मिळू शकेल का? अशी दोन्ही गटातील उमेदवारांना साशंकता आहे.
जर शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून शिवसेनेचे उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाही तर तालुक्यात शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आहे हे विसरून चालणार नाही. त्यामुळे भविष्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेला मोठा संघर्ष करावा लागेल.
जुन्नर तालुक्यातील राजकीय परिस्थिती आज आहे अशीच राहिली तरीही, अन् काही घडामोडी घडल्या तरीही विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही.
विद्यमान आमदार राष्ट्रवादीच्या सत्ताधारी अजित पवार गटाचे असून विविध विकासकामांच्या माध्यमातून जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे.
तर शरदचंद्र पवारांनी जुन्नर तालुक्यात केलेल्या दौर्यांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणार्या उमेदवारांचा राजकीय गोंधळ निर्माण झाला आहे.
सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू
राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लवकरच लागू होईल अशी परिस्थिती असल्याने जुन्नर विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने रणनीती आखत आहे.
आज जुन्नर तालुक्यात महाविकास आघाडी व महायुती एकमेकांसमोर दिसून येत असली तरी भविष्यात आघाडी व युतीत अनेक घडामोडी घडताना दिसून येतील.





