“….तर भाजपने थयथयाट केला असता,” राज ठाकरेंच्या गंगेच्या पाण्यावरील विधानावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

Sanjay Raut on Raj Thackeray | मनसेच्या 19 व्या वर्धापनादिनानिमित्त पिंपरीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील स्नानावर भाष्य केलं. ज्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. त्यांच्या या विधानानंतर नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे सहकारी आहेत. राज ठाकरे यांनी मधल्या काळामध्ये हिंदुत्वाचा पुकार केला आहे. अचानक ते हिंदुत्ववादी झालेत. आता राज ठाकरे यांच्या जागी अन्य कोणी नेता असता तर या विधानावर भारतीय जनता पक्षाने थयथयाट केला असता की कसा हिंदुत्वाचा अपमान झाला. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाबरोबर काम करतो. महायुती, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतो आहे. राज ठाकरे यांच्या मताशी हे दोन्ही प्रमुख पक्ष सहमत असतील.”
…तर भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी हिंदुत्ववादाने थयथयाट केला असता
“मी राज ठाकरे यांच्या विधानावर माझे मत व्यक्त करत नाही. या प्रत्येकाच्या भावना आहेत आणि मते आहेत. त्यांना वाटले म्हणून ते बोलले. पण हे दुसरं कोणी बोलले असते तर याच भारतीय जनता पक्षाच्या ढोंगी हिंदुत्ववादाने थयथयाट केला असता. विशेष: आमच्यापैकी कोणी बोलले असते तर रस्त्यावर येऊन आमच्या निषेधाचे मोर्चे काढले असते,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला. Sanjay Raut on Raj Thackeray |
राज ठाकरे काय म्हणाले?
“आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतोय तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत आणि बाळा नांदगावकर म्हणतात साहेब हे गंगेचं पाणी घ्या, कोण पिणार ते पाणी? 2 वर्ष तोंडाला फडके बांधून फिरले आणि तिकडे जाऊन अंघोळ करत आहेत. श्रद्धेला पण काही अर्थ आहे की नाही? या देशामधली एक नदी स्वच्छ नाही. आम्ही काय नदीला माता म्हणतो. परदेशात जातो तेव्हा स्वच्छ नद्या पाहतो. ते काय तिथे माता म्हणत नाहीत, तरी नदी स्वच्छ असते.”
“राजीव गांधी असल्यापासून गंगा स्वच्छ होणार हे ऐकत आहे. राज कपूर यांनी चित्रपट काढला, लोकांना वाटलं गंगा साफ झाली. पण त्यात वेगळी गंगा होती. लोक म्हणाले, अशी गंगा साफ असेल तर आम्हीही आंघोळ करायला तयार आहोत. पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही. या सगळ्या श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा,” असे राज ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा:





